प्रतिनिधी/पेठ वडगाव
पेठ वडगाव येथील नवीन वसाहतीत बदलापूरहून आलेला एक युवकाचा रिपोर्ट आज कोरोना पॉझिटिव्ह आला. यामुळे प्रशासनाची पुन्हा धावपळ उडाली. वडगाव शहरातील ही पाचवी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे वडगाव शहरात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.
पेठ वडगाव शहरातील नवीन वसाहतीत राहत असलेला युवक बदलापूर येथे नोकरीस आहे. हा युवक गेल्या आठवड्यापूर्वी वडगाव येथे राहण्यासाठी आला. वडगाव येथे येण्यापूर्वी तो अतिग्रे येथे स्वॅब घेण्यासाठी गेला व तेथे तीन दिवस क्वारंटाइन होवून रिपोर्ट येण्याची वाट पहिली. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला वडगाव येथे पाठविण्यात आले. वडगाव पालिकेच्या बळवंतराव यादव हॉस्पिटलने या युवकास घरी स्वतंत्र राहण्याची खोलीची सोय असल्याने होम क्वारंटाइन केले. कालावधी संपल्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या तब्येतीची असलेल्या तक्रारीबाबत सांगली येथे दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. यावेळी त्या डॉक्टरनी त्याला कोरोना चाचणी करण्यास सांगितले. या चाचणी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला.
या बाबत जिल्हा प्रशासनाने वडगाव पालिकेस माहिती कळविली असता मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी तात्काळ या भागात जंतुनाशक फवारणी करण्याबाबत संबंधित विभागास कळविले. या युवकास उपचारास सीपीआर प्रशासनाने नेले आहे. तर नातेवाईकाना अलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले आहे. पालिका कर्मचारी यांनी हा परिसर सील केला आहे. हा युवक व त्याचे नातेवाईक शहरात कोणाच्या संपर्कात आले आहेत ते कोठे फिरले आहेत याची माहिती पालिका प्रशासन घेत आहे. पालिका मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
दरम्यान वडगाव शहरात भाजीपाला खरेदीसाठी नातेवाईक येवून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. अशा प्रकारे यापुढेही एखादा कोरोना रुग्णही फिरून समूह संसर्ग वाढेल अशी भिती व्यक्त होत असून पालिकेने भाजी मार्केट परिसरातून भाजीपाला दुकाने हलवून नागरी वस्तीतून बाहेर सुरक्षित ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांना बसण्याची सोय करण्याची अथवा भाजीपाला फिरून विक्री करण्याबाबत प्रशासनाने सूचना देण्याची मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे. हा भाजीपाला बाजार न हलविल्यास पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन करणार असल्याचे भाजी मार्केट परिसरातील लोकांनी सांगितले.