प्रतिनिधी / पेठ वडगाव
हातकणंगले पेठ वडगाव व परिसरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या अनुषंगाने पेठ वडगावमध्ये कोविड सेंटर चालू करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी पेठ वडगाव येथील धन्वंतरी हॉस्पिटलची पाहणी केली. जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचेशी चर्चा करून या रुग्णालयासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व अन्य सर्व वैद्यकीय सुविधा, औषधे तसेच मेडिकल स्टाफ येत्या दोन दिवसात उपलब्ध करून देवून पेठ वडगाव येथे हे रुग्णालय चारच दिवसात सुरू करणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.
पेठ वडगाव परिसरात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पेठ वडगाव येथे कोविड सेंटर सुरु करण्याबाबत युवक क्रांती महाआघाडीच्यावतीने खासदार माने यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर खासदार माने यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या.
याठिकाणी साठ बेडचे कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. याच्या नियोजनासाठी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, नगरसेवक संदीप पाटील, संतोष चव्हाण, कालिदास धनवडे आदीसह नगरसेवक यांची बैठक घेवून आढावा घेतला. यानंतर वडगाव येथील खाजगी डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकार्यांच्या बरोबर खासदार धैर्यशील माने यांनी बैठक घेतली व या कोविड रुग्णालयांमध्ये खाजगी डॉक्टर व कर्मचारी सहभागाचे नियोजन केले व डॉक्टरांना लागणाऱ्या वैद्यकीय साहित्य व इतर सेवा सुविधा बाबत चर्चा केली. पेठ वडगावमधील या कोविड रुग्णालयासाठी शासनाकडून लागेल ती मदत मिळवुन देईन व पूर्णवेळ मेडिकल ऑफिसर व सीएचओची नेमणूक शासनाच्या वतीने या हॉस्पिटलमध्ये केली जाईल असे खासदार माने यांनी सांगितले.
यावेळी वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या व नगरसेविका प्रविता सालपे, नगरसेवक संतोष चव्हाण, शिवसेना वडगाव शहरप्रमुख व नगरसेवक संदीप पाटील, मुख्यधिकारी सुषमा कोल्हे, धन्वंतरी हॉस्पिटलचे विनायक पाटील, अभिनंदन सालपे, हॉस्पिटलचे अधिकारी डॉक्टर, डॉ. अशोक चौगुले, डॉ. महेश हिरवे, शिवसेना उपशहर प्रमुख अंकुश माने, सुनिल माने, युवासेना वडगाव शहर प्रमुख अनिल माने, पोपट सुतार, शकील जमादार, खाजगी डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी, पत्रकार, शिवसैनिक अजित माने, अक्षय माने, किरण जाधव,अमोल जाधव, संदीप नाईक, सुरेश जाधव, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.