प्रतिनिधी/पेठ वडगाव
हातकणंगले तालुक्याच्या पश्चिम भागात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पेठ वडगाव येथे कोव्हिड सेंटर कार्यरत होण्याची गरज वडगाव परिसरातील गावातून व्यक्त होत आहे. या बाबत खासदार धैर्यशील माने व आमदार राजूबाबा आवळे यांनी सेंटर चालू होण्याबाबत प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
हातकणंगले तालुक्यात पश्चिम भागातील गावामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना संसर्ग होवू नये यासाठी त्यांना क्वारंटाइन करणे यासाठी हातकणंगले व अतिग्रे येथे असलेल्या दोन कोव्हिड केंद्रावर रुग्णांना पाठवावे लागते. त्या ठिकाणच्या यंत्रणेवर प्रचंड ताण दिसून येत आहे. वडगाव परिसरातील रुग्णांना या ठिकाणी घेवून जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणेची प्रचंड धावपळ उडत आहे.
वडगाव परिसरातील वाढत कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर परिसरातील कोडोली पर्यंतच्या गावापर्यंतच्या रुग्णांच्या सोयीसाठी पेठ वडगाव येथे कोव्हिड सेंटर सुरु करण्याची गरज व्यक्त होत आहे. या परिसरात कोव्हिड सेंटर सुरु करण्याबाबत सर्व्हे झाला असून ठिकाणेही प्रशासनाने पहिली आहेत. मात्र अद्याप केंद्र सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहे.