मतदार यादीतील गोंधळानंतर महापालिका प्रशासन सतर्क : निवडणूक कार्यालयातील स्टाफ वाढविला : सुट्टीच्या दिवशीही काम
प्रतिनिधी / कोल्हापूर
महानगरपालिकेच्या निवडणूक पूर्व प्रारूप मतदार यादीतील प्रचंड गोंधळ उघड झाल्यानंतर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. तांत्रिक गोष्टींमुळे प्रभाग निहाय मतदार याद्या सदोष बनल्या. त्याचा परिणाम इच्छुक उमेदवारांबरोबरच मतदारांवरही होणार असल्याने ही बाब महापालिका प्रशासनाने गंभीरपणे घेतली असून प्रभाग निहाय प्रत्येक मतदाराची व्हेरिफिकेशन करून अंतिम मतदार यादी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने निवडणूक कार्यालयाला आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.
प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये मोठा गोंधळ झाल्याचे आरोप होत आहेत. एका प्रभागातील चारशे ते दोन अडीच हजार पर्यंत संख्येचे मतदार दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले आहे. आपल्या हक्काचे उमेदवार इतर प्रभागात गेल्याने राजकीय गणित बिघडण्याच्या भीतीने अनेक इच्छुकांनी हरकती घेण्याच्या दृष्टीने तयारीही केली आहे.
बीएलओच्या सदोष कामामुळे गेंधळ
राज्य निवडणूक आयोगाने 15 जानेवारी 2021 च्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीला अंतिम धरून महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय मतदार यादी फोडण्याचे आदेश दिले होते. विधानसभेच्या मतदार यादीला भाग यादी म्हणतात. त्यात भागाचा उल्लेख असला तरी भागाच्या सिमा रेषा दाखविलेल्या नसतात. प्रभागानुसार यादी फोडताना मतदाराचे नाव, घरनंबर, गल्ली यांचा विचार करावा लागतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रिया बीएलओच्या (बूथ लेव्हल ऑफिसर) स्तरावर सर्व्हे करताना काही उणिवा राहिल्याने काही प्रभागातील मतदार यादीत गोंधळ निर्माण झाला आहे. त्यात आता हरकतीनंतर कर्रेक्शन अर्थात दुरूस्ती करण्यात येणार आहे.
गेंधळानंतर प्रशासन सतर्क
मतदार यादीतील गोंधळाच्या तक्रारी आणि आरोपांनंतर महापालिका प्रशासनाने दुरूस्तीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार चारही विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता यांच्यासह कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक, मुकादम आणि बीएलओ व इतर अधिकारी असा सध्या अस्तित्वात असलेल्या स्टाफसह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा स्टाफ वाढविण्यात आला. सुमारे चारशे ते पाचशे जणांचा हा स्टाफ आहे. आलेल्या हरकतींबरोबर जाणवत असलेल्य त्रुटी, दोषात सुमोटो (स्वतःहून) लक्ष घालून त्याचे निरसन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
प्रत्येक मतदाराचे व्हेरिफिकेशन होणार अंतिम मतदार यादी जाहीर करण्याआधी सर्व हरकती, सूचनांची बारकाईने तपासणी करून त्यानुसार दुरूस्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदार, त्याचे पत्ता, गल्ली यानुसार प्रभाग यादी तयार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. |
सदोष मतदार यादीमुळे महापालिका प्रशासनावर टीका प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीतील गोंधळानंतर टीका सुरू झाली आहे. शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी यामध्ये राजकीय खेळी असल्याचा आरोप केला आहे. सदोष यादी तयार करण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी इंगवले यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष तथा माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला आहे. ते अधिकारी कर्मचाऱ्यांवर जबाबदार ढकलत आहेत, असा आरोप केला आहे. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी सदोष मतदार यादीला जबाबदार कोण? याची माहिती कोल्हापूरच्या जनतेपुढे जाहीर करण्याची मागणी केली आहे. |
शुक्रवार अखेर 177 हरकती प्रारूप मतदार यादीवर 16 फेब्रुवारीपासून हरकती दाखल होत आहेत. शुक्रवार 19 फेब्रुवारी रोजी 79 हरकती दाखल झाल्या. या दिवस अखेर एकूण 177 हरकती दाखल झाल्या आहेत. |