प्रतिनिधी/कोल्हापूर
प्रदेश काँग्रेस कार्यकारणीवर नवनियुक्ती पदाधिकारी इचलकरंजीचे नगरसेवक शशांक बावचकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, सूर्यकांत पाटील बुधीहाळकर यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार केला. नूतन पदाधिकाऱयांना मिळालेल्या संधीचा पक्ष विस्तारासाठी उपयोग करावा, असे आवाहन पालमंत्र्यांनी केले. या नंतर त्यांनी जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांची संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.
दरम्यान सत्कार समारंभात गांधीनगर ग्रामपंचायत उपसरंपच ऋतु शेरवानी, विनोद गुजरानी, धीरज केरानी यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याना कधीही संधी मिळत असते. त्यांच्या निष्ठेचा पक्ष जरुर विचार करतो. त्यामुळे पक्षाचे काम करत रहा असे आवाहन केले. इचलकरंजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष मल्हारपंत बावचकर तब्बल 33 वर्षे शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या निष्ठेची पक्षाने योग्य दखल घेतल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले.
कार्यक्रमास आमदार चंद्रकांत जाधव, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महिला आघाडीच्या अध्यक्षा संध्या घोटणे, संजय पोवार वाईकर यांच्यासह विविध सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.