विद्याधर पिंपळे / कोल्हापूर
कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील प्रवासी आणि मालवाहतूक बंद होती. त्यामुळे वाहनधारक मोठय़ा आर्थिक अडचणीत आले होते. त्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्याच्या परिवहन खात्याने महत्वाचा निर्णय घेताना एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या काळातील वाहनधारकांकडून आकारला जाणारा होम टॅक्स पूर्णपणे माफ केला आहे. सुमारे 600 कोटी रूपयांचा होम टॅक्स माफ केल्याने सरकारच्या तिजोरीवर भार पडणार आहे. मात्र राज्यातील 10 ते 11 लाख वाहनांच्या मालकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील वाहतूक वगळता रिक्षा, टॅक्सी, प्रवासी बस, स्कूल बस, ट्रक, टॅम्पो, टँकर, डंपर, कंन्टेनर, टेलरसह अर्थमुव्हिंगची वाहतूक पूर्णपणे बंद होती. औद्योगिक अस्थापना बंद असल्याने आयात, निर्यात ठप्प झाली होती. त्याचा मालवाहतुकीवर परिणाम झाला. आंतरजिल्हा बंदीमुळे प्रवासी वाहतूकही पूर्णपणे बंद राहिली. गेली सहा महिने वाहने थांबून राहिल्याने वाहनधारक मोठय़ा आर्थिक अडचणीत आले होते. वाहनांची देखभाल, दुरूस्ती, चालकाचा पगार आदी गोष्टी सुरू होत्या.
त्यामुळे वाहनधारक संघटना, लॉरी ऑपरेटर संघटना आदींनी राज्यशासनाकडे होम टॅक्स माफ करण्याची मागणी केली होती. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटरचे अध्यक्ष सुभाष जाधव आणि त्यांच्या पदाधिकाऱयांनी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांची तीन वेळा भेट घेऊन होम टॅक्स माफ करण्यात यावा. आर्थिक अडचणीत आलेल्या वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली होती. मंत्री सतेज पाटील यांनीही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाहधारकांच्या व्यथा मांडल्या होत्या. त्यातून राज्य शासनाने अत्यंत महत्वाचा निर्णय घेताना राज्यातील वाहकांना एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या काळातील तब्बल सहाशे कोटींचा होम टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला.
11 लाख वाहनांच्या मालकांना लाभ
राज्यात 3 लाख मालवाहतूक करणारी ट्रक, टॅम्पो, टँकर, डंपर, कंन्टेनर टेलरसह अर्थमुव्हिंगची वाहने आहेत. तर तब्बल 7 ते 8 लाख प्रवासी वाहने आहेत. त्यामध्ये रिक्षा, टॅक्सी, ट्रव्हल बस, स्कूल बस यांचा समावेश आहे. या सर्वांना होम टॅक्स माफीचा लाभ मिळणार आहे.
सरकारचा निर्णय दिलासा देणारा : सुभाष जाधव
कोरोनामुळे अडचणीत आल्यानंतर होम टॅक्स माफ करण्यासाठी आम्ही परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील यांच्याबरोबर बैठक घेतल्या, निवेदने सादर केली. त्यांनी आमच्या समस्या जाणून घेऊन शासन दरबारी पाठपुरावा केला. न्याय देण्याची भूमिका घेतली. होम टॅक्स माफ करण्याचा निर्णय दिलासा देणार आहे, अशी प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली.
कोल्हापूरवर दृष्टीक्षेप
वाहन संख्या
रिक्षा 15 हजार
ट्रक 16 हजार|
टॅम्पो 11 हजार
बसेस 2200
ट्रक्टर 5 ते 6 हजार
कोरोनामुळे अडचणीत आलेल्या सर्व घटकांना मदत देण्याचे काम महाविकास आघाडीचे सरकार करत आहे. स्टँप डय़ुटी माफ करून घर घेणार्यांना दिलासा दिला. वाहनधारकांना होम टॅक्स माफ केला. इतर घटकांनाही मदत करण्याचा आघाडी सरकारचा मानस आहे. -सतेज पाटील, परिवहन राज्य मंत्री, तथा पालकमंत्री कोल्हापूर