– आठ ते दहा जणांकडून काठीने मारहाण – सातवे येथील तरुणाचा मृत्यू
प्रतिनिधी/कोल्हापूर
प्रेम प्रकरणातून सातवे ( ता. पन्हाळा) येथील महाविद्यालयीन तरुणास काल, बुधवारी सायंकाळी आठ ते दहा जणांनी काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये शिवतेज उर्फ मोन्या विनायक घाटगे (वय18) याचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना तातडीने अटक करा अशी मागणी करत मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे सीपीआर शवविच्छेदन विभाग परिसरात तणाव निर्माण झाला.
याबाबत पोलिस आणि नातेवाइकांनी दिलेली अशी की, शिवतेज घाटगे याचे एका मुलीवर प्रेम होते. या वरून मुलीच्या नातेवाईकांचा आणि त्याचा यापूर्वी वाद झाला होता. तो बुधवारी सायंकाळी शिवतेज टेम्पोतून दिपक हांडे यांची म्हैस सोडण्यासाठी सातवे ते कांदे मार्गावर गेला होता. यावेळी आठ ते दहा जणांनी दुचाकीवरुन त्याचा पाठलाग सुरु केला. मार्गावरच शिवतेजचा टेम्पो अडवून, त्याला काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. टेम्पोमध्ये बसलेल्या दिपक हांडे यांना हल्लेखोरांनी दमदाटी करुन गावी परत जाण्यास सांगितले. हा प्रकार सुरु असताना तेथे परिसरातील नागरिक जमा झाले. तसे हल्लेखोरांनी त्याला दुचाकीवर बसवून दुसरीकडे नेले. त्या ठिकाणी नेवून विवस्त्र करत मारहाण केली. घाबरलेल्या अवस्थेत दिपक हांडे यांनी हा प्रकार त्यांच्या नातेवाईकांना फोन करून सांगितला. नातेवाईकानी मांगले भागातील घटनास्थळी धाव घेऊन जखमी शिवतेजला कोडोली पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्याला प्रथम उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तू चालत आणि बोलत होता. रात्री वैद्यकीय तपासणीसाठी त्याला कोल्हापुरात आणले. पण मध्यरात्री त्याची प्रकृती अधिकच खालावली. पुढील उपचारासाठी त्याला सीपीआर रुग्णालयात हलवले. पण उपचारापूर्वीच गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
संशयीतांना अटक करा
घडलेल्या प्रकाराची कोडोली पोलीस ठाण्याने गांभीर्याने दखल घेतली नाही. मारेकऱयावर खूनाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना तात्काळ अटक करा त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका घेतली. शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सीपीआरला भेट दिली. त्याआधी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शिराळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. संशयीतांना लवकरच अटक करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
शिवतेजवर पोक्सो अंतर्गत गुन्हा
शिवतेज घाटगे याच्यावर कोडोली पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. दोन ते तीन महिन्यापूर्वी शिवतेजने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. या गुह्यात शिवतेजला ताब्यात घेवून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती.