प्रतिनिधी / कोल्हापूर
सांगली जिह्यातील शिराळा येथील सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचे कर्ज घेतले नसतानाही शहर आणि उपनगरातील अनेकाना कर्ज व्याजासह भरण्याबाबतच्या वसुलीच्या नोटीसा आल्या. या नोटीसा पाहून अनेकजण हादरुन गेले. तर काहीना मानसिक धक्का बसला आहे. नोटीसा आलेल्या व्यक्तीनी मंगळवारी शाहुपुरी पोलिसात धाव घेवून या बँकेच्या अजब गजब प्रकाराविषयी तक्रार दाखल केली. याप्रकराने कोल्हापूरसह सांगली जिह्यातील सहकार क्षेत्रा एकच खळबळ उडाली आहे.
रिझर्व्ह बॅकेने शिराळा येथील सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक आर्थिक डबघाईला आल्याने नुकतेच संचालक मंडळ बरखास्त करुन, प्रशासकाची नियुक्ती केली आहे. प्रशासक म्हणून सांगलीचे सहकार उपनिबंधक आदिनाथ दगडे यांची नियुक्ती केली असून, त्यांनी 15 मे ला पदभार स्विकारला आहे. याचदरम्यान त्यांना बॅकेच्या थकीत कर्ज खात्याची तपासणी करताना सुमारे 32 कोटी रुपयांची सुमारे 1761 इतकी कर्ज खाती संशयास्पद दिसून आली. त्या सर्व कर्ज खातेदारांना त्यांनी कर्ज आणि त्यावरील व्याजासह वसुलीच्या नोटीसा लागू केल्या. तसेच कर्जदारांची खाती सन 2011 ला उघडण्यात आली असून, या खात्यापैकी काही खात्यावर जमा-खर्चाचा व्यवहार करण्यात आला आहे. पण त्यांची कर्ज खाती थकीत गेल्याने त्यांना कर्जाची वसुलीविषयी नोटीसा काढण्यात आल्या नसल्याची गंभीर बाब प्रशासक दगडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी अशा कर्ज खातेदारांना कर्ज व त्यावरील व्याजाच्या वसुलीच्या नोटीसा काढून लागू केल्या आहे.
यामध्ये कोल्हापूर शहर आणि फुलेवाडी रिंगरोड परिसरातील अनेक कुटूंबांना कर्ज थकबाकी वसुलीची नोटीसा आल्या आहेत. या नोटीसीम् सांगली जिल्हयातील शिराळा येथील सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेच्या सागाव शाखेकडून पाठवण्यात आल्या आहेत. नोटीसामध्ये बँकेतून आपण 2 लाख रूपये कर्ज उचललंय, मात्र त्याची वेळेत परतफेड केलेली नाही, त्यामुळे आपण तातडीने कर्ज, व्याज आणि दंड व्याजापोटी 3 ते 4 लाख रूपये बँकेत भरावेत, अशी सुचना या नोटीसीमध्ये करण्यात आली आहे. अशा या नोटीसा बघून ज्या बँकेचा पत्ता माहित नाही, ज्या बँकेची कधी पायरी चढलेली नाही, अशा बँकेकडून कर्ज वसुलीची नोटीस आल्यामुळे अनेक कुटूंबांचे धाबं दणाणले. तर काहीना चांगलाच मानसिक धक्का बसला आहे.
नोटीसा आलेल्यांनी मंगळवारी सकाळी नोटीसीवरील संपर्क मोबाईल नंबरवर संपर्क साधला. तेंव्हा त्यांना शहरातील दाभोळकर कॉर्नर येथील सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेच्या शाखेत संपर्क साधायला सांगण्यात आले. त्यानुसार नोटीसधारक बँकेत गेले. तेंव्हा त्यांना त्यांची कागदपत्रे सादर करून, बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आल्याचे दिसून आले. त्यावरुन संबंधीत कर्ज वसुली नोटीसा धारकांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात धाव घेवून, याप्रकरणी तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या पुढे आव्हान
कर्जाच्या नोटीसा लागू झालेल्या व्यक्तीची कर्जाच्या फॉर्मला जोडलेली कागदपत्रे खरी असून, कर्जाच्या फॉर्मवर केलेल्या सह्या मात्र खोटय़ा असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्या संबंधीत व्यक्तीची ओरिजनल कागदपत्रे बँकेपर्यंत पोचली कशी आणि कुणी पोचवली, याचाही छडा लावण्याचे आव्हान पोलीसांसमोर उभे राहिले आहे.
अंगठेवाले असून त्याची कर्जाच्या फॉर्मवर सह्या
नोटीसाधाकरांनी या बँकेंचे कधी तोंड बघितले नाही. अशाना बँकेकडून 2 लाख रूपये कर्ज घेतल्याप्रकरणी वसुलीच्या नोटीसा आल्या आहे. यापैकी अनेक नोटीसाधारक अंगठा करीत असून, त्याच्या कर्जाच्या फॉर्मवर सह्या करण्यात आल्या आहे.