प्रतिनिधी / कोल्हापूर
केरळ, हरियाणा, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांसह महराष्ट्रात परभणीमार्गे बर्ड फ्ल्युने राज्यात प्रवेश केल्यानंतर जिल्हा प्रशासनही अलर्ट झाले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दुपारी जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची तातडीने बैठक घेवून आढवा घेतला. मार्गदर्शक सूचना जारी करत दक्ष राहण्याच्या सूचना पशुसंवर्धन, आरोग्य विभागास दिल्या. पक्ष्यांमध्ये अनैसर्गिक मृत्यू आढळल्यास त्याची तात्काळ माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेला तात्काळ देण्यात यावी. अशा सूचनाही त्यांनी केल्या. तर संशयीत आढळल्यास तातडीने उपाययोजना करण्यासाठी 13 रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी बैठकीत दिली.
बर्ड फ्ल्यु रोग प्रादुर्भाव व प्रसाराबाबत मार्गदर्शक सूचना
पक्ष्यांची अचानक मर्तुक वाढल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास कळवावी. मृत पक्ष्यांशी थेट संपर्क टाळावा
संशयित क्षेत्रावरुन पक्ष्यांची वाहतूक पूर्ण बंद करावी.
उघड्या कत्तलखान्यात जैवसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी. कत्तलखान्यातून पक्षी परत येणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
करांकडून जंतू संक्रमित होणार नाहीत याची दक्षता घेणे
पाहुणे पक्षी भेट देत असलेल्या भागात सतर्कता बाळगणे
मांस व अंडी शिजवून खाल्ल्यामुळे विषाणू जिवंत रहात नाहीत.
पोल्ट्री फार्मससाठी जैव सुरक्षा बाबत मार्गदर्शक सूचना
पक्ष्यांच्या आरोग्यासाठी मुलभूत स्वच्छताविषयक अटींचे पालन करावे
स्वच्छता, वाहतूक, मलमूत्र व्यवस्थापन, मृत पक्ष्यांची विल्हेवाट, खाद्य सुरक्षा, उपचार, लसीकरण, योग्य
रोग नमुने गोळा करणे आवश्यक
स्थलांतरित पक्षी, वन्य पक्षी, कावळे इत्यादीमध्ये मर्तुक आढळल्यास फार्मवर त्यांचे शवविच्छेदन करु नये
संशयित प्रादुर्भाव झालेल्या फार्मवरुन पक्ष्यांची वाहतूक, विक्री, खरेदी, खाद्य वाहतूक पूर्णपणे थांबवावी
प्रत्येक 15 दिवसाला गावातील कोंबड्यांची खुराडी, गुरांचे गोठे, गावातील गटारे, नाले, पशुपक्ष्यांचा वावर
असलेल्या भिंती व जमिनीवर तात्काळ फवारणी करावी
चिकन व मटण सेंटर व अंडी विक्रीसाठी मार्गदर्शक सूचना
चिकन व मटण विक्री करणाऱ्या दुकानांची तसेच वैयक्तिक स्वच्छता ठेवावी
बाधीत क्षेत्रावरुन अंडी किंवा पक्ष्यांची वाहतूक थांबवावी.
चिकन व मटण सेंटरवरील पिसे, पक्ष्यांची त्वचा कोंडाळ्यात न टाकता योग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी
चिकन व मटण सेंटरचे दररोज निजतुकीकरण केले पाहिजे.
प्रतिबंधक उपाययोजना कार्यवाही सुरु
बर्ड फ्ल्युच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुरु आहेत. ऑनलाईन बैठका घेवून प्रत्येक तासाला आढावा घेतला जात आहे. पशुवैद्यकीय संस्थेमार्फत 450 नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत. वन विभाग, जिल्हा परिषद व महसूल विभाग यांचेशी संवाद साधून प्रतिबंधक उपाययोजना कार्यवाही सुरु आहे.
-डॉ. वाय. ए. पठाण, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त