प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया वेग घेत आहे. अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण यांचे गॅझेटही प्रकाशित झाले आहे. राजकीय हालचालीही वेग आहेत. गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर शहराच्या मध्यवस्तीतील हाय व्हाल्टेज प्रभाग असणाऱ्या बाजार गेट प्रभाग क्रमांक ३१ आणि खोल खंडोबा प्रभाग क्रमांक ३० या प्रभागातील काही भाग एकमेकांकडे वळविण्यात आला आहे. एका शुद्धीपत्रकाव्दारे ही दुरूस्ती महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाने केली आहे. या संदर्भात शुद्धीपत्रकाचे गॅझेट छपाईसाठी येरवडा शासकीय मुदणालयात पाठविण्यात आले आहे.
शुद्धीपत्रकानुसार खोल खंडोबा आणि बाजार गेट परिसरातील दोन प्रगणक गट बदलण्यात आले आहेत. बाजार गेट प्रभागात असणारा नागराज गल्लीचा भाग खोल खंडोबा प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचबरोबर खोलखंडोबा प्रभागातील गवळी गल्लीच्या भागाचा बाजार गेट प्रभागात समावेश करण्यात आला आहे. ही आदला बदली करत असताना भौगोलिक सलगतेचा विचार केल्याचे समजते. एक एक प्रगणक गटांची आदलाबदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आदलाबदली केलेले दोन्ही प्रगणक गट सुमारे ६०० ते ७०० लोकसंख्येचे आहेत. प्रभागाची सिमारेषा यांचाही विचार या बदलात केल्याचे सांगण्यात आले.
आदलाबदलीचा इच्छुकांना तोटा
बाजार गेट आणि खोल खंडोबा प्रभागातील भागांच्या आदलाबदलीचा फायदा आणि तोटा इच्छुकांना सहन करावा लागणार आहे. बाजारगेटमधील इच्छुक असणाऱया चार माजी नगरसेवक आणि दोन माजी नगरसेविकांना तर खोल खंडोबात इच्छुक असणाऱया एका माजी नगरसेवक आणि नगरसेविकेला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांची राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता आहे.