प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर राज्य शासनाने अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. मंगळवारी प्रशासक मंडळाची यादी जाहीर करण्यात आली. या प्रशासक मंडळावर 13 अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये एक मुख्य प्रशासकांसह 12 प्रशासकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहर उपनिबंधक प्रदीप मालगावे यांच्याकडील प्रशासक पदाचा कार्यभार आता प्रशासक मंडळाकडे जाणार आहे. गेल्या आठवड्यातच मालेगाव यांची प्रशासक पदावर नियुक्ती केली होती.त्यानुसार त्यांनी प्रशासक पदाचा कार्यभार देखील स्वीकारला होता.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची मुदत संपल्यामुळे त्यांनी राजीनामे दिले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी बाजार समितीचे कामकाज हाताळण्यासाठी शहर उपनिबंधक प्रदीप मालगावे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. पण अवघ्या चार ते पाच दिवसातच राज्यशासनाकडून बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे.
मुदत संपण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना १५ संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामे दिले होते. तर सभापती आणि उपसभापतींनी एक दिवस अगोदर राजीनामा दिला.त्यानंतर बाजार समितीची सूत्रे प्रशासकांकडे आली. संचालकांनी नियमबाह्य पद्धतीने केलेल्या आप्तेष्टांच्या नोकर भरतीचे भवितव्य प्रशासक आणि जिल्हा उपनिबंधक यांच्या निर्णयावर अवलंबून होते. पण आता अशासकीय प्रशासकीय मंडळामध्ये नेत्यांच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी दिल्यामुळे सर्व चौकशीच्या फायली बंद होणार आहेत.
नवनियुक्त प्रशासक मंडळ
कृष्णराव परशराम पाटील रा.मुधाळ ता.भुदरगड यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती केली असून प्रा.जालंदर गणपती पाटील रा.राशिवडे ता.राधानगरी, बळीराम हरी पाटील रा.वडणगे ता.करवीर, सचिन दौलतराव घोरपडे रा.वाघापूर ता.भूदरगड, करणसिंह संजय गायकवाड रा. सुपात्रे ता.शाहूवाडी, कल्याणराव व्यंकटराव निकम रा.वसरेवाडी,ता भुदरगड ,सुर्यकांत ऊर्फ बाळासाहेब रघुनाथ पाटील, रा.बामणी ता कागल, राजेंद्र यशवंतराव पाटील ,रा. सोळंकुर, ता. राधानगरी, दिगंबर बाळासाहेब उर्फ बाबासाहेब पाटील,रा दिंडणेर्ली, ता. करवीर, अजित बाबुराव पाटील रा माले, ता.पन्हाळ, अजित पांडूरंग पाटील, रा. परिते, ता.करवीर, सुजाता काकासाहेब सावडकर,रा.आणूर ता.कागल , दगडू गोविंद भास्कर रा.कूडी ता.करवीर या बारा जणांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.