लॉकडाऊनमध्ये घडली साळोखे पार्कात घटना
राजेंद्र होळकर / कोल्हापूर
कोरोना महामारीमुळे करीत असलेले काम गेले. त्याचबरोबर पत्नी मनोरुग्ण आणि आई-वडील वयोवृध्द असल्याने त्यांचे संगोपन करता-करता नाकी नऊ आल्याने, एका चांदी कारागिराने स्वतःच्या पोटच्या गोळ्याला सांभाळता येईना, म्हणून एका तृतीयपंथीला दहा वर्षीय शाळकरी मुलग्याला दिले नोटरीव्दारे दत्तक. हा दत्तक प्रकार तब्बल चार महिन्यानंतर शनिवारी (19 सप्टेंबर) दुपारी शहरातील एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याच्यामुळे उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी दत्तक दिलेल्या मुलग्यासह त्यांचे वडील आणि संबंधीत तृतीयपंथीयाला पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी सुरु केली आहे.
पोलीस ठाण्यातून समजलेली माहिती अशी, पन्हाळा तालुक्यातील काटे भोगाव येथील दिंगबर उर्फ उत्तम जोतीराम पाटील या युवकाचा माजगाव (ता. पन्हाळा) येथील एका युवतीशी 17 वर्षापूर्वी विवाह झाला असून, या दाम्पत्याला दोन मुले आहेत. शहरातील एका चांदी उद्योजकाकडे दिंगबर उर्फ जोतीराम हा चांदी कारागीर म्हणून काम करतो आहे. कामाच्या व्यापामुळे तो पत्नी, दोन मुले आणि वयोवृध्द आई-वडीलाच्या समवेत राहण्यासाठी कोल्हापूरात आला. सध्या तो गंगावेश परिसरातील सावंतवाडा येथे राहत आहे. आपण आणि आपले काम भले म्हणणाऱया या युवकाच्या पत्नीला मानसिक आजाराची लागण झाली. त्यांने पत्नीवर बरेच औषध उपचार केले. पण त्यांचा काहीही उपयोग झाला नसल्याने, मोठा मुलगा स्वतःकडे ठेवून घेवून, त्यांने मनोरुग्ण पत्नी आणि लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी सासरवाडीला पाठविले
याचदरम्यान कोरोना संसर्गजन्य विषाणूची महामारी सुरु झाली. या महामारीमुळे दिंगबर उर्फ उत्तमचे काम बंद झाल्याने त्यांच्या कुटूंबाची वाताहत होवू लागली. त्यामुळे त्यांने आपल्या दहा वर्षाच्या मुलग्याचा सांभाळ करण्यासाठी दुसर्या व्यक्तीला देण्याचा निर्णय घेतला. यांची माहिती शहरातील राजेंद्रनगर रोडवरील साळोखे पार्कमध्ये राहणार्या गजेंद्र गुंडाळे नामक तृत्तीयपंथीयास समजली. तो या मुलग्याचा सांभाळ करण्यासाठी पुढे येवून, या मुलग्याला नोटरीव्दारे त्यांने दत्तक घेतले. हा दत्तकाचा कार्यक्रम 29 मे रोजी कोरोनाचा लॉकडाऊनमध्ये साळोखे पार्कमध्ये झाला. या दिवसापासून या मुलगा या तृत्तीयपंथीकडे राहत आहे.
अनलॉकमध्ये आपला नातू जावयाने एका तृत्तीयपंथीयाला दिल्याची माहिती त्यांच्या सासूला समजली. तिने याबाबत जावयाकडे अनेकदा विचारणा केली. पण तो उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागला. अखेर शनिवारी सकाळी शहरातील एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याच्या मदतीने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्याकडे धाव घेतली. पोलीस अधिकार्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेवून दिंगबर उर्फ उत्तम, संबंधीत तृत्तीयपंथासह संबंधीत मुलग्याचा शोध घेवून सर्वांना ताब्यात घेवून चौकशी करण्याबाबतचा आदेश दिला. त्यावरुन पोलिसांनी या सर्वांचा शोध घेवून त्वरीत ताब्यात घेवून चौकशी सुरु केली आहे.