मंगळवारी दिवसभर निम्यापेक्षा जास्त शाळा, महाविद्यालयांनी केली दुरूस्ती
पूरग्रस्त भागातील शाळा महाविद्यालयांच्या अडचणी समजून मुदतवाढ
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य शासनाच्या सूत्रानुसार बारावीचा निकाल तयार करून, ऑनलाईन सिस्टिममध्ये सबमिट केला आहे. परंतू अनावधाने राहिलेल्या चुकांच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात झाली असून, जवळपास निम्यापेक्षा जास्त शाळांनी त्रुटींची पुर्तता केली आहे. पूरग्रस्त भागातील ज्या शाळांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही संबंधीत शाळांना त्वरीत निकालातील त्रुटींची दुरूस्ती करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.
कोल्हापूर विभागीय मंडळात बारावीच्या निकालातील त्रुटींच्या दुरूस्तीसाठी मंगळवारी कँप ठेवण्यात आला होता. महापूरामुळे बहुतांश शाळा, महाविद्यालयांना कँपसाठी उपस्थित राहाता आले नाही. अशा शाळा ज्येंव्हा येतील तेंव्हा निकालात दुरूस्ती करून घेतली जाणार आहे. तरी संबंधीत शाळांनी विद्यार्थी हित लक्षात घेवून निकालातील त्रुटींची पुर्तता त्वरीत करावी, असे आवाहन विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. ऑनलाईन निकालातील त्रुटींची दुरूस्ती पूर्ण झाल्यानंतर बारावीचा ऑनलाईन निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
अकरावी सीईटीचा प्रवेश अर्ज भरण्यास वेग
अकरावी सीईटीचा अर्ज भरण्यास पुन्हा एकदा प्रारंभ झाला आहे. बदललेल्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचण दूर झाल्याने अर्ज भरण्यास कोणतीही अडचण आलेली नाही. त्यामुळे अकरावी सीईटीचा अर्ज भरण्यास वेग आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना चुकीची माहिती भरलेली आहे. त्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरूस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच 20 ते 21 जुलै दरम्यान ज्यांनी अर्ज भरला आहे, अशा विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर मोबाईल नंबर टाकल्यानंतर अर्ज उपलब्ध होणार आहे.
सीबीएससी, आयसीएसईचे आजपासून अकरावी सीईटी अर्ज
सीबीएससी, आयसीएसई शिक्षण मंडळांतर्गत अकरावी सीईटीचे अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत दहावीची परीक्षा 2021 पुर्वी उत्तीर्ण झाले आहेत. असे विद्यार्थ्यांनाही अर्ज भरता येणार आहे. https://cet.11thadmission.org.in या संकेत स्थळावर 2 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यास मुदत असून विद्यार्थ्यांनी अचुक माहिती भरावयाची आहे.