14 दिवसांत ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
प्रतिनिधी / कोल्हापूर
महावितरणच्या कोल्हापूर मंडळातील 2 लाख 93 हजार 977 वीज ग्राहकांनी 41 कोटी 85 लक्ष रूपये वीज बिलाचा भरणा करून महावितरणच्या वीज बिल वसुली मोहिमेस प्रतिसाद दिला. त्यामधील 79 हजार 548 वीज ग्राहकांनी 7 कोटी 75 लाख रूपये ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरले आहे. तर 2 लाख 14 हजार 429 वीज ग्राहकांनी 34 कोटी 11 लाख रूपये वीज बिल भरणा केंद्राद्वारे केला.
कोल्हापूर शहर विभागात सर्वाधिक 67 हजार घरगुती ग्राहकांनी 9 कोटी 42 लाख रूपये वीज बिल भरले आहे.
गडहिंग्लज विभागात 53 हजार 986 ग्राहकांनी 9 कोटी 15 लाख, कोल्हापूर ग्रामीण विभाग 2 मधील 60 हजार 490 ग्राहकांनी 7 कोटी 37 लाख, कोल्हापूर ग्रामीण विभाग 1 मधील 40 हजार 795 ग्राहकांनी 6 कोटी 77 हजार, जयसिंगपूर विभागात 29 हजार 473 ग्राहकांनी 5 कोटी 20 लाख रूपये तर इचलकरंजी विभागातील 42 हजार 203 ग्राहकांनी 3 कोटी 94 लाख रूपये वीज बिल भरणा केला आहे. वीज ग्राहक महावितरण मोबाईल ऍप, अधिकृत संकेतस्थळावरील ग्राहक पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने वीजबिलाचा भरणा करू शकतात.
जानेवारी अखेरपर्यंत ग्राहकांना वीज बिलाची थकबाकी असतानाही अखंडित सेवा दिली. एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला नाही. मात्र महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता थकबाकी वसूली आवश्यक आहे. ग्राहकांसाठी हप्त्यात वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून दिलेली आहे. तरी ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन आहे.