सुभाषनगरातील घटना; दोघाना अटक, मटका बुकी मालक पसार
प्रतिनिधी/कोल्हापूर
सुभाषनगरामध्ये फोनवरुन मटका घेणाऱ्या अड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला शिवीगाळ करीत, त्यांचावर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या दोघांना पाठलाग करुन पकडले. त्याचाकडून मटक्याचे साहित्य, २ हजार ७० रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल असा ११ हजार ७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राजारामपूरी पोलिसात मटका बुकी मालकासह मटका घेणाऱ्या दोघा एजंट अशा तिघाविरोधी गुन्हा नोंद झाला आहे.
विष्णू काशिनाथ माने (वय ६०, रा.श्री बालाजी पार्क शेजारी, आयसोलेशन हॉस्पीटल मागे, कोल्हापूर ), विजय युवराज बागडे ( ३१, रा. जुना कंदलगाव नाका, जवाहरनगर, कोल्हापूर ) अशी अटक केलेल्या दोघा एजंटाची नावे आहेत. तर योगेश अभंगे ( रा. अमळनेर, जि. अहमदनगर ) असे पसार मटका बुकी मालकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरु असून, रात्री उशिरा पर्यत तो पोलिसाच्या हाती लागला नव्हता.
याबाबतची अधिक माहिती अशी, शहरातील सुभाषनगराच्या चौकामधील झाडाखाली दोघे जण उघड्यावर मोबाईलवरून कल्याण मटका जुगार घेत आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसाच्या एका पोलीस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना पाहून मटका घेणारे विष्णू माने व विजय बागडे या दोघांनी रस्त्याच्याकडे पडले दगड घेवून पोलिसांच्यावर दगडफेक व शिवीगाळ करीत पळून जावू लागले. तरी देखील मोठया धाडसाने पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन दोघाच्या मुसक्या आवळल्या.
या दोघाना पोलीस ठाण्यात आणून चांगलाच खाक्या दाखविला. याच दरम्यान या दोघानी मटका बुकी मालक योगेश अभंगे याच्यासाठी मटका घेत असल्याचे उघड झाले. त्यावरुन विष्णू माने आणि विजय बागडे या दोघाविरोधी पोलीसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तर मटका बुकी मालक अभंगे यांच्या विरोधात अवैध मटका बुकी सुरु केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.