प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरात मतदान केंद्र निहाय लसीकरण केंद्र सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याचबरोबर कोल्हापूरसाठी आवश्यक प्रमाणात कोरोनाच्या लस साठा उपलब्ध द्यावा अशी विनंतीही ईमेल द्वारे पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे : केंद्र शासनाने 1 मे 2021 पासून 18 वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाचे आदेश दिले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोल्हापूर शहरात महापालिकेच्या विविध 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातून सध्या लसीकरण केले जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरत असल्याने, त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, महानगरपालिका प्रशासनाकडे मर्यादित लस साठा उपलब्ध होत असल्याने, बहुतांश नागरिकांना लसीकरणाअभावी परतावे लागत आहे. सध्याची परिस्थिती पाहता 1 मे पासून लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल डीस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी लसीकरण केंद्र वाढवणे आवश्यक आहे. याकरिता महानगरपालिका प्रशासनाने शहरात मतदान केंद्रनिहाय लसीकरण केंद्र सुरु करण्यास परवानगीची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
यामुळे व्यापक लसीकरण होवून कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होणार आहे. लसीकरणासाठी प्रशासन सज्ज असून, उर्वरित संपूर्ण शहराचे लसीकरण करण्यास अंदाजे 3 लाख डोस आवश्यक आहेत. आवश्यक प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास अख्ख्या शहराचे लसीकरण पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. या बाबींच्या अनुषंगाने कोल्हापूर शहरात मतदान केंद्र निहाय लसीकरण केंद्र सुरु करण्यास परवानगी देवून आणि आवश्यक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनात क्षीरसागर यांनी केली आहे.