रेडिरेकनरनुसार भाडेआकारणी इस्टेट विभागाचा नगररचना विभागाला प्रस्ताव
पाच वर्षांतील 40 कोटींचे थकीत भाडे होणार वसूल
संजीव खाडे / कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेने भाडेतत्वावर दिलेल्या शहरातील 1595 दुकानगाळ्यांचे रेडिरेकनरनुसार मूल्यांकन होणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर महापालिकेच्या इस्टेट विभागाने या सर्व दुकानगाळ्यांचे मूल्यांकन करण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठविला आहे. मूल्यांकनानंतर दुकानगाळ्यांचे भाडे वाढणार आहे. गेल्या साडेपाच वर्षांत थकीत असलेले तब्बल 30 ते 40 कोटी रूपये नवीन भाडे आकारणीमुळे महापालिकेला महसूल रूपात मिळणार आहेत.
शहरातील छत्रपती शिवाजी मार्केट, राजर्षी शाहू क्लॉथ मार्केट, कपिलतीर्थ मार्केट, ताराराणी मार्केट, कोटीतीर्थ मार्केट, महापालिकेची इमारत आदींसह विविध ठिकाणी मार्केट व भागात महापालिकेचे दुकानगाळे आहेत. त्याचबरोबर महापालिकेने काही ठिकाणी केबिन्सही भाडेतत्वावर दिली आहेत. दुकानगाळ्यांची संख्या 1595 इतकी आहे. या ठिकाणी वर्षांनुवर्षे व्यापारी व्यवसाय करत आहेत. 2014-15 च्या दरम्यान, रेडिरेकनरनुसार कर आकारणीची पद्धत सुरू झाली. घरफाळा आकारणी रेडिरेकनरने सुरू झाली. त्याचप्रमाणे महापालिकेच्या दुकानगाळ्यांचे भाडेही रेडिरेकनरनुसार आकरण्याचा प्रस्ताव पुढे आला. पण त्यावेळी भाडेकरू असणाऱया दुकानदारांनी रेडिरेकनरच्या दरानुसार भाडे देण्यास नकार दिला. न्यायालयात महापालिकेविरोधात अपिल केले. न्यायालयाने सुनावणीनंतर महापालिकेच्या बाजूने निकाल दिला.
त्रिसदस्यीय समिती अन् मूल्यांकन
न्यायालयाच्या निकालानंतर राज्य शासनाने जिल्हाधिकारी, आयुक्त आणि मुदांक अधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. महापालिकेच्या इस्टेट विभागाने नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना 1595 दुकानगाळ्यांचे रेडिरेकनरनुसार मूल्यांकन करून देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण अहवाल त्रिसदस्यीय समितीकडे जाणार आहे. या समितीच्या मंजुरीनंतर रेडिरेकनरनुसार भाडे आकारणी सुरू होणार आहे. त्यासाठी गाळेधारकांना महापालिकेच्या वतीने नोटिसाही बजावल्या जाणार आहेत.
असे होणार मूल्यांकन
शहरातील विविध भागातील रेडिरेकनर वेगवेगळा असतो. महापालिकेचे दुकानगाळे हे मार्केटच्या कोणत्या बाजूस आहेत. याचा विचार मूल्यांकनात केला जाणार आहे. मुख्यरस्त्याच्या बाजूस, आतील बाजूस, बाहेरील बाजूस अथवा मार्केटच्या पहिल्या मजल्यावर दुकानगाळा असेल तर त्यानुसार रेडिरेकनर ठरणार आहे. जो रेडिरेकनर असेल त्यावर आधारित सूत्रानुसार दुकानगाळÎाचे भाडे आकारले जाणार आहे.
भाडे वाढले तर सुविधा मिळणार काय?
महापालिका दुकानगाळ्यांचे भाडे रेकनरनुसार आकारणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र वाढीव भाडे आकारताना मार्केटमध्ये पार्किंग, स्वच्छतागृह, सुरक्षाविषयक सुविधा देणार काय? हा प्रश्न आहे.
30 ते 40 कोटी महापलिकेच्या तिजोरीत
1 एप्रिल 2015 पासून महापालिकेने दुकानगाळ्याचे भाडे भरून घेतलेले नाही. गेल्या साडेपाच वर्षांत नवीन रेडिरेकनरच्या सूत्रानुसार तब्बल 30 ते 40 कोटी रूपये भाडे थकीत आहे. मूल्यांकनानंतर भाडेरूपाने महापालिकेच्या तिजोरीत कोटÎवधींचा महसूल जमा होणार आहे.