वार्ताहर / नवे पारगाव
मनपाडळे ता. हातकणंगले तेथे गोठ्यांना लागलेल्या आगीत तीन जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आगीत प्रापंचिक साहित्य व धान्य वैरण मिळून चार ते पाच लाखाचे नुकसान झाले तसेच एक महिला जखमी झाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मनपाडळेच्या दक्षिणेस असणाऱ्या वस्तीवर शनिवार दुपारी चारच्या सुमारास दिनकर दबडे यांच्या गोठ्यास आग लागल्याचे शेजारील शेतीत पाणी पाजत असलेल्या वसंत दबडे यांनी पाहिले त्यांनी आरडाओरडा करून लोकांना कल्पना दिली. वस्तीवरील लोकांनी विहिरीवरील मोटार चालु करून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत शेजारील तानाजी दबडे यांच्या गोठ्यास आग लागली तसेच बाजूला असणाऱ्या गवताच्या गंजीने पेट घेतला त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले यावेळी दिनकर दबडे यांची पत्नी छाया दबडे यांनी त्यांच्या गोठ्यातील जनावरे सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या हाताला भाजून त्या जखमी झाल्या.
सदर घटनेची माहिती गावात समजताच सरपंच रायबाराजे शिंदे उपसरपंच उल्हास वाघमारे व ग्रामस्थ मदतीकरिता धावून आले तसेच आग विझवण्यासाठी वारणा कारखान्याचे अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले त्यांनी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली.
या आगीत दिनकर दबडे यांच्या मालकीची एक गाय व एक म्हैसाना जातीची म्हैस तसेच तानाजी दबडे यांच्या मालकीची म्हैसाना जातीची म्हैस दगावली त्याचबरोबर गवताची गंजी वैरण प्रापंचिक साहित्य व धान्य जळल्यामुळे एकूण चार ते पाच लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. मृत जनावरे पाहून व दोन गरीब कुटुंबावर आलेली परिस्थिती पाहून ग्रामस्थ हळहळत होते.