राज्य शासनाकडून मान्यतेवर शिक्कामोर्तब
1 जानेवारी 2020 पासून अंमलबजावणीचे आदेश
प्रतिनिधी / कोल्हापूर
नवरात्रोत्सवाच्या काळात आणि दिवाळीच्या तोंडावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर आहे. राज्य शासनाने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास अंतिम मान्यता दिली आहे. जानेवारी 2020 पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पूर्वलक्षी प्रभावाने लाभ मिळणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची महापालिका कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण झाली आहे.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह पाणी पुरवठा विभाग आणि प्राथमिक शिक्षण मंडळाकडील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन निश्चिती करण्यास महापालिकेच्या सभागृहाने यापूर्वीच मान्यता दिली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने या संदर्भातील प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविला होता. त्याला राज्य शासनाने मान्यता दिली. 1 जानेवारी 2020 पासून वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिकेला बुधवारी प्राप्त झाले असल्याची माहिती महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांनी दिली. आयोग लागू केल्याबद्दल राज्य शासनाचे आणि त्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल महापालिकेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचेही संजय भोसले यांनी आभार मानले आहे.
4500 कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
सातवा वेतन आयोग लागू झाल्याने कोल्हापूर महापालिकेच्या साडेचारहजार कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. 2016 ऐवजी 1 जानेवारी 2020 पासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे जानेवारीपासूनच्या वेतन फरकाची रक्कमही मिळणार आहे.
महापालिकेच्या तिजोरीवर 35 कोटींचा भार
सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर त्यानुसार कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर 35 कोटी रूपयांचा भार पडणार आहे. सभागृहाने यापूर्वी ठराव मंजूर करताना अर्थसंकल्पात 35 कोटींची तरतूद करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.
सातवा वेतन आयोग लागू करण्याची मनपा कर्मचाऱ्यांची जुनी मागणी होती. त्याला मान्यता दिल्याबद्दल राज्य शासनाने आभार. त्याचबरोबर पाठबळ देणारे महापालिकेचे नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी आणि शासनस्तरावर पाठपुरावा करणारे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचेही आभार.
– संजय भोसले, अध्यक्ष ,कोल्हापूर महापालिका कर्मचारी संघ