काँग्रेस नेतृत्वाचा निर्णय : मनपा सभागृहाची मुदत संपेपर्यंत पदावर राहण्याची मिळणार संधी : इच्छुकांच्या पदरी निराशा
संजीव खाडे / कोल्हापूर
कोरोनाच्या कार्यात आघाडीवर राहून कार्य करणाऱया महापौर निलोफर आजरेकर यांना मुदतवाढ मिळणार आहे. 15 नोव्हेंबरला महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत संपणार आहे. तो पर्यंत आजरेकर यांना महापौरपदी राहण्याची संधी लाभणार आहे. सद्या असलेली कोरोनाची स्थिती आणि राजकीय कारणांचा विचार करून काँग्रेस नेतृत्वाने आजरेकरांना सभागृहाची मुदत संपेपर्यंत पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात आजरेकर या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. गेली सात महिने त्यांची चांगले कार्य केले. कोरोनाच्या काळात त्यांच्याकडून सुरू असलेले कार्य लक्षवेधी ठरले आहे. महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे आणखी एका सदस्याला महापौरपदी संधी देण्याचे काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न होते. जुलैपर्यंत आजरेकर या महापौरपदी राहतील. त्यानंतर नोंव्हेबरपर्यंत पुढील चार महिने इतर इच्छुकांपैकी एका नगरसेविकेला महापौरपदी संधी देण्याचे काँग्रेसचे नियोजन होते. पण जून, जुलैपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने महापौर निवडणूक घेणे अशक्य बनले. त्यामुळे आजरेकर यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. आता निवडणूक घेण्यासंदर्भात जरी राज्य शासनाने परवानगी देणारा आदेश काढला असला तरी नजिकच्या काळातील सर्व गोष्टींचा विचार करून काँग्रेस नेतृत्वाने महापौरपदी आजरेकर यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन महापौर निवड करताना सध्याच्या महापौरांनी राजीनामा देण्यासाठी सभा आयोजित करावी लागते. त्यानंतर त्याची माहिती विभागीय आयुक्तांना कळवावी लागते. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून नवीन महापौर निवडीचा कार्यक्रम येतो. त्यानुसार सभा घेऊन नवीन महापौर निवड करावी लागते. त्यासाठी जिल्हाधिकारी पीठासीन अधिकारी असतात. या प्रक्रियेला किमान महिन्याभराचा वेळ जातो. सध्या विद्यमान सभागृहाची मुदत संपण्यास दोन महिन्यांचा काळ शिल्लक आहे. अशावेळी नवीन महापौर निवड केली तर त्याला केवळ एकच महिना पदावर राहता येणार आहे. त्यामुळे निवडीचा हेतू व्यापक अर्थात सार्थ होणार नाही. तसेच सध्या शहरात कोरोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने निवडणूक टाळून संसर्ग रोखण्यावर भर देणे आणि एक महिन्याच्या महापौरावर विरोधकांकडून टीका होऊ नये, अशा विविध मुद्दय़ांवर विचार करून महापौर आजरेकर यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय काँग्रेस नेतृत्वाने घेतला आहे.
इच्छुकांच्या पदरी निराशा
महापौरपदासाठी दीपा मगदूम, उमा बनछोडे आणि जयश्री चव्हाण या तीन नगसेविका इच्छुक होत्या. पण आता त्यांच्या पदरी निराशा येणार आहे. भविष्यात त्यांना संधी देण्याचे आश्वासन काँग्रेस नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आजरेकरांना मुदतवाढ मिळण्याची कारणे
नवीन महापौर निवडल्यास त्याला केवळ महिनाभर पदावर राहण्यास मिळणार
एक महिन्याचा महापौर केल्यास विरोधकांकडून भांडवल केले जाऊ शकते
कोरोनाच्या काळात संसर्ग रोखण्यावर भर देणे महत्वाचे