व्हनाळी / वार्ताहर
राज्यातील हॉलीबॉल खेळाडूंची माहिती प्रमाणपत्रासह एका क्लीकवर उपलब्ध व्हावी. राज्यभर योग्य प्रकारे स्पर्धेचे योग्य नियोजन करता यावे. यासाठी महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशनची अधिकृत वेबसाईट सुरु करण्याची घोषणा भारतीय हॉलीबॉल महासंघाचे उपाध्यक्ष व राज्याचे अध्यक्ष विजय डांगरे यांनी केली.
भारतीय व्हॉलीबॉल महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा बाचणी (ता.कागल) येथील दिशा अॕकॕडमीच्या सभागृहात उत्साहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय डांगरे होते. सभेस महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री डांगरे म्हणाले,” महाराष्ट्रात समांतर हॉलीबॉल संघटना स्थापन झाल्यामुळे काही ठिकाणी गोंधळाची स्थिती आहे.परंतु आपल्या संघटनेला नॅशनल फेडरेशनचे पत्र मिळणार आहे. त्यामुळे हॉलीबॉलच्या भवितव्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.”
स्वागत व प्रास्ताविक तसेच आहवालवाचन सहसचिव निलेश जगताप यांनी केले. जे.डी.भट्टा यांनी लेखा परिक्षण अहवालाचे वाचन केले.
सभेत आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल मार्गदर्शक अजित पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच भारतीय व्हॉलीबॉल संघटनेच्या कार्यकारणी मध्ये उपाध्यक्षपदी विजयभाऊ डांगरे व सचिवपदी संजय नाईक यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.
सभेस महाराष्ट्र व्हॉलीबॉल सचिव संजय नाईक, सहसचिव निलेश जगताप, कोल्हापूर जिल्हा व्हाॅलीबाॅल पासिंग असोसिएशनचे अध्यक्ष रमेश तोडकर , सचिव शिवाजी पाटील ,तसेच कोल्हापुर पासिंग व्हाॅलीबाॅल संघटनेचे सर्व सदस्य, पंच, प्रशिक्षक , जिल्हाक्रीडा संघटक, राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.प्रा.अजित पाटील यांनी आभार मानले.
रेल्वे नोकरीत आरक्षणची मागणी
भारतीय व्हॉलीबॉल संघाचे सहसचिव संजय नाईक म्हणाले,” ग्रामीण भागातून जास्तीत जास्त खेळाडू हॉलीबॉलकडे आकर्षित व्हावेत म्हणून दहावी मध्ये गुणांबरोबरच, पोलीस भरतीसह, आता रेल्वेमध्येसुद्धा नोकरीसाठी आरक्षित कोटा मिळावा अशी मागणी संघटना करणार आहे. अशी मागणीही सभेत करण्यात आली