महापालिकेच्या पहिल्या सभागृहातील नगरसेवक काळाच्या पडद्याआड
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेच्या निर्मितीनंतर झालेल्या 1978 च्या पहिल्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात निवडून येण्याचा बहुमान संपादन करणारे माजी उपमहापौर आनंदराव शंकरराव सुतार (वय 78, रा. निगडे वसाहत, दुधाळी) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे सुनील आणि संतोष, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 1978 ते 1995 या काळात लक्षतीर्थ वसाहतीतून एकदा आणि दुधाळी प्रभागातून दोनवेळा असे एकूण तीनवेळा ते नगरसेवक झाले. दोनवेळा उपमहापौर, स्थायी समिती सदस्य आणि ताराराणी आघाडीचे पक्ष प्रतोद म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे ते समर्थक होते. एकेकाळी बॅडमिंटनपटू म्हणून कोर्ट गाजविणाऱया सुतार यांनी आपल्या नगरसेवकपदाच्या काळात अनेक विकासाची कामे केली. साधेपणा जपत जनतेत मिसळणारा नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती होती. विद्यमान नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्या पुढाकाराने सुतार यांचे नाव त्यांच्या हयातीत दुधाळी पॅव्हेलियनमधील बॅडमिंटन कोर्ट देण्यात आले होते. 9 मार्चला हा सुतार यांच्या कार्याचा सन्मान करणारा कार्यक्रम झाला होता.
पहिल्या सभागृहातील सदस्य काळाच्या पडद्याआड
1978 मध्ये महापालिकेचे पहिले सभागृह अस्तित्वात आले. तेंव्हा बाबासाहेब कसबेकर यांना पहिले महापौरपद भूषविण्याची संधी लाभली. कसबेकर यांच्यासारख्या कडक शिस्तीच्या महापौरांबरोबर काम करण्याची संधी सुतार यांना लाभली. सुतार यांच्या रूपाने महापालिकेच्या पहिल्या सभागृहातील सदस्य काळाच्या पडद्याआड गेला.