प्रतिनिधी/कोल्हापूर
यादव नगर परिसरामध्ये मुलांचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या एक महिला आणि तिच्या दिराला मारहाण झाली. यातूनच माजी नगरसेवकाचा मुलगा सागर आप्पासाहेब गायकवाड(वय ४२) याच्यासह त्याच्या दोन सहकाऱ्यांवर विनयभंगाचा आणि तोडफोडीचा गुन्हा राजारामपुरी पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यादव नगर परिसरामध्ये माजी नगरसेवक आप्पासाहेब गायकवाड यांचा मुलगा सागर हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. या परिसरामध्ये मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास लहान मुलांमध्ये वादावादी झाली होती. हा वाद सोडवून एक महिला आणि तिचा दीर घरी जात होते. या दरम्यान सागर गायकवाड याने महिलेच्या दिराला बोलावून घेत वाद मिटवायला तू काही नेता झालास का असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली
दिराला मारहाण होत असल्याचे पाहून संबंधित महिला मध्ये आली. त्यावेळी सागर गायकवाड याने त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने वर्तणूक करून विनयभंग केला. तसेच जाताना सागर व त्याच्यासोबत असलेल्या प्रेम मिरजे, सुधीर चव्हाण या तिघांनी मिळून संबंधित महिलेच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडून दोन हजार रुपयांचे नुकसान केले. याबाबत संबंधित महिलेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सागर गायकवाड याच्यासह २ सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सागर गायकवाड याला अटक करण्यात आली आहे.