मध्यवर्ती बसस्थानकातील पहाटेची घटना
कोल्हापूर-पुणे या एस.टी.वर माथेफिरुने दगडफेक करुन नुकसान केले
प्रतिनिधी / कोल्हापूर
मध्यवर्ती बसस्थानकातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.वर माथेफिरुने दगडफेक केली. कोल्हापूर-पुणे या एस.टी.च्या समोरच्या काचेवर दगड मारल्यामुळे काचेला तडा जावून नुकसान झाले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीसांनी एकनाथ सोमाण्णा हलगेकर (वय 32 रा. खानापूर, बेळगाव) याला ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुखांच्या वाहनांवर हल्ला केला. या घटनेनंतर दोन्ही राज्यातील एस.टी.ची वाहतूक बंद करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे साडेपाच वाजता हलगेकर नावाच्या माथेफिरुने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक केली. मुंबई-पुणे या फलाटावर बस थांबली असता त्याने अचानक बसवर दगडफेक केली. यामुळे बसच्या दर्शनी काचेला तडे गेले. ही घटना येथील वाहक चालकांच्या निदर्शनास येताच त्यांनी हलगेकर याला पकडून शाहूपुरी पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मध्यवर्ती बसस्थानकात तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस निपाणी आगारापर्यंत सोडण्यात येत असून बेळगावला जाणाऱ्या बसेस थांबवण्यात आल्या आहेत.