कचरावेचक कुटुंबातील मुलांसाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य शासनाने कचरावेचक कुटुंबांतील मुलांसाठी मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या मुलांचे शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन फॉर्म भरून घ्यावेत, अशी मागणी अवनी संस्थेने गुरूवारी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
समाजकल्याण अधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात, अवनी संस्था शिक्षणापासून वंचित कचरावेचक कुटुंबातील मुलांसाठी कार्यरत आहे. शहरात कचरावेचकांचे प्रमाण मेठे आहे. आर्थिक स्थितीअभावी चौथी, सातवीनंतरचे विद्यार्थी गळतीचे प्रमाण अधिक आहे. कचरावेचकांच्या मुलांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृती योजना लागू केली आहे. कचरावेचकांच्या मुलांना या योजनेचा लाभ मिळाल्यास चौथी, सातवीनंतर गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
तरी कचरावेचकांच्या मुलांचे मॅट्रिकपूर्व शिष्यवृतीचे ऑनलाईन फॉर्म भरावेत, अशी मागणी केली आहे. याशिवाय जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना यासंदर्भात लेखी सूचना द्याव्यात. कचरावेचकांच्या जास्तीत जास्त मुलांना याचा लाभ मिळावा, त्यासाठी कचरावेचक वस्तीतील कार्यकर्त्यांचे शिबीर घ्यावे, मॅट्रिकपूर्व शिष्यवृतीचे फॉर्म जमा करण्याची मुदत वाढवावी, आदी मागण्या आहेत. निवेदन देताना बाल अधिकार मंचचे सुप्रिया औहाळ, जोया तुर्की, अवनीच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले, वनिता कांबळे, अन्नपूर्णा कोगले, किरण नाईक, भारती कोळी, लक्ष्मी कांबळे, जरीना बेपारी आदी उपस्थित होते.