जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यांच्या पुढाकाराने अत्यसंस्कार
प्रतिनिधी / वारणानगर
कोरोना रुग्णाचा मृतदेह ताब्यात देत नसल्याने नातेवाईकांची होणारी घालमेल या सर्वाचा परिणाम उपचार घेणाऱ्या कोरोना रूग्णात व नातेवाईक यांच्यात वाढलेले भय व ताण निवळण्यासाठी मोहरे ता. पन्हाळा येथे जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यांच्या पुढाकाराने कोरोना मृत व्यक्तीवर गावच्या स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यानी कोरोनाने मृत्यू झालेल्या व त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यास सहभागी असणाऱ्या मोजक्याच व्यक्तीना पीपीई किट उपलब्द करून दिलेवर विधिवत पध्दतीने मृतावर अत्यसंस्कार करण्यात आले याबाबत गावात सर्वच स्थरातून समाधान व्यक्त करण्यात आले. गाव पातळीवर ग्रामीण भागात कोरोनाची बाधा होणे या निमित्ताने कुटूंब अलगीकरण होणे शेजारी, गल्लीत व गावात देखील याचा मोठा मानसिक आघात होत आहे. त्यामुळे कोरोनाचे भय वाढत आहे अशातच कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेस कोण पुढे देखील यायला तयार होईना अगदी जवळचे नातेवाईक देखील पाठ फिरवतात अशी आजची स्थिती झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान होणारा मृत्यू, अत्यसंस्कारासाठी होणारी मृतदेहाची हेळसांड, गावाऐवजी शहरात पंचगंगा स्मशानभूमीत अत्यसंस्कार होण्यासाठी वाढलेला ताण असे असून देखील शहरात ज्या पध्दतीने कोरोना रुग्णावर अत्यसंस्कार करतात त्यांना कोणतीही बाधा झालेली नाही. याचा विचार करून शहरातील धर्तीवर सर्व खबरदारी व उपाय करून गांवातच कोरोना मृतकावर अत्यसंस्कार झालेतर गांवातील मृतदेहांची हेळसांड होणार नाही, शहरातील सद्या अत्यसंस्काराचा वाढलेला ताण कमी होईल व ग्रामीण भागातील कोरोनाचे निर्माण झालेले भय व ताण कमी होण्यास मदत होईल यासाठी सर्व उपाय योजना करून गावातच कोरोना मृतकावर अत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यानी सांगितले.