कोरोनामुळे मूर्तिकार, गणेशमंडळांच्या भूमिका : नियमांनुसारच साजरा करणार उत्सव
चार फुटांपर्यंतच्याच गणेशमूर्ती बनवण्यास प्राधान्य
संग्राम काटकर / कोल्हापूर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे होत असलेली मनुष्यहानी आणि आगामी तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून यंदाचाही गणेशोत्सव कसा असावा याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाने जाहीर केल्या आहेत. या सूचनांमधून सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सव धुमधडाक्यात नव्हे तर साध्या पद्धतीने साजरा करावा लागेल हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिका, स्थानिक प्रशासनाची परवागनी घ्यावीच लागेल, ही अटही आता घातली आहे. शिवाय 4 फुटांपर्यंतच्याच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणे बंधनकारक केल्याने 11, 15, 18 आणि 21 फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचे मंडळांनी पक्के केले आहे.
या संदर्भात मूर्तिकार व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना
नियमांनुसारच गणेशोत्सव करा….
कोरोनाच्या सध्याच्या दुसऱ्या लाटेसह येणाऱया तिसऱया लाटेचा विचार करूनच मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा. शासनाने जे नियम लागू केलेले आहेत, त्याचे उल्लंघन होणार नाही, यासाठी दक्ष राहावे लागेल. अतिउत्साहाच्या भरात गर्दी करून गणेशोत्सव साजरा करताना कोरोना संसर्ग पसरवण्यात आपण कारणीभूत ठरू नये. कोरोनाचे परिणाम मंडळालाही भोगावे लागतील हे विसरून चालणार नाही, याची जाणीव ठेवत छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाने यंदाही 21 फुटीऐवजी लहान गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत आरोग्य तपासणी अथवा रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे ठरवले आहे.
राजू नागवेकर (संस्थापक अध्यक्ष : छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळ)
शाडू द्या अन्यथा प्लास्टरबंदी हटवा…
गतवर्षीप्रमाणे यंदाच्या गणशोत्सवाच्या तोंडावर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवर बंदी येईल ही भीती होती. त्यामुळे मधला मार्ग म्हणून मूर्तिकार प्लास्टर-शाडू मिक्स करुन गणेशमूर्ती बनवत आहेत. तसेच गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशमूर्तीच्या उंचीवरील निर्बंध कायम राहतील हे गृहीत धरुन 4 फुटांपर्यंतच्याच गणेशमूर्ती बनवण्याला प्राधान्य दिले आहे. प्लास्टरच्या गणेशमूर्तीवर बंदी घालताना मूर्तिकारांना शाडू देणार की नाही, हे शासन सांगत नाही. यावरुन शासन प्लास्टर बंदीबाबत किती गंभीर आहे हेच सुचित होते. त्यामुळे सरकारने शाडू उपलब्ध करुन द्यावी किंवा प्लास्टरबंदी हटवावी.
– प्रकाश पाडळकर, मूर्तिकार
शासनाचे आवाहन अभिनंदनीयच..
गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने होणारी गर्दी टाळण्यासाठी शासनाने सांस्कृतिक कार्यक्रम व देखावे करू नये असे आवाहन केले आहे. या आवाहनाचे मंडळांनी स्वागत केले पाहिजे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव आरोग्यदूत बनूनच साजरा करावा. शनिवार पेठेतील न्यू सम्राट चौक तरुण मंडळाने स्वच्छतेबाबतची जनजागृती करण्याबरोबरच गणेशभक्तांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यावर एकमत केले आहे. तसेच 21 फुटीऐवजी सव्वाफुटी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले आहे.
बबन गवळी (अध्यक्ष : न्यू सम्राट चौक तरुण मंडळ)
ऑर्डरीनंतरच गणेशमूर्ती करणार
शासनाने 4 फुटांपर्यंतच्याच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे बंधन घातल्याने उंच गणेशमूती मूर्तिकार करूच शकणार नाही. तसेच मंडळांकडून ऑर्डर आल्याशिवाय मूर्तिकार नियमाप्रमाणे गणेशमूर्ती बनवणार नाहीत, हे मंडळांनी लक्षात घ्यावे. कारण उंचीच्या बंधनामुळे मंडळांची पारंपरिक पद्धतीची गणेशमूर्ती छोट्या आकारात करणे अशक्य आहे. जे पारंपरिक मंडळ आवडीनुसार गणेशमूर्तीची ऑर्डर देणार नाही, त्यांना मूर्तिकारांकडे ज्या रूपामध्ये गणेशमूर्ती उपलब्ध आहे तीच घ्यावी लागेल.
राकेश वडणगेकर, मूर्तिकार
शासनाने असे केले आहे मंडळांना आवाहन
- गर्दी टाळण्यासाठी गणेशमूर्ती दर्शनाची ऑनलाईन व्यवस्था करा.
- गणेशमूर्तीची आरती, भजन, किर्तन अथवा अन्य धार्मिक कार्यक्रमास गर्दी नको. ध्वनिप्रदूषण रोखा.
- गणेशमंडप सतत निर्जंतुकीकरण करून घ्यावा.
- भाविकांचा ताप मोजण्यासाठी थर्मल क्रीनिंगची व्यवस्था करा.
- गणेशमंडपात सोशल डिस्टन्स पाळा