वार्ताहर / यड्राव
अनैतिक संबंधातून किराणा व्यवसायिक असलेल्या प्रशांत भिकाजी भोसले (वय 36) रा.बेघर वसाहत यड्राव या युवकाचा सतूरने छातीवर वार करून निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी संशयित आरोपी अमित उर्फ पिंटू आदमाने याला शहापूर पोलिसांनी एका तासात अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की प्रशांत भोसले यांचे किराणा दुकानाचे व्यवसाय होते तर संशयित आरोपी पिंटू आदमाने हा पडेल ते काम करून उदरनिर्वाह करत होता. हे दोघे एकमेकांचे मित्र होते तरीही संशयित आरोपी पिंटू आदमाने याला आपल्या पत्नीबरोबर प्रशांतचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता परंतु त्याने कधीही हा संशय व्यक्त केला नव्हता. त्यामुळे नेहमी प्रशांत बरोबर मित्रासारखा वागत होता. परंतु पिंटू आदमाने याच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दि.11 रोजी रात्री आठ वाजल्यापासून पिंटू आदमाने हा दारू पिऊन दारूच्या नशेत होता. रात्री दहाच्या सुमारास प्रशांत भोसले हा दुचाकीवरून घरी जात असताना पाण्याची टाकी जवळ दबा धरून बसलेल्या पिंटू आदमाने याने त्यांना थांबवले व काही कळायच्या आतच त्याने सोबत आणलेल्या सत्तूर ने छातीवर वार केला. सत्तुर थेट हृदयाला लागल्याने प्रशांत खाली कोसळला व मोठा रक्तस्राव सुरू झाला. तो पर्यंत स्थानिक नागरिक गोळा होताच संशयितांनी पळ काढला तर मित्रमंडळींनी त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला
मृत्यूनंतर शव विच्छेदनासाठी रात्री साडेअकरा वाजता इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे आणले परंतु या ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी कर्मचारी नसल्याने सकाळी सहा वाजेपर्यंत मृतदेह ताटकळत ठेवण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासन चांगलेच धारेवर धरले. नातेवाईक आक्रमक झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याला तात्काळ बोलावून घेऊन शवविच्छेदन पूर्ण करून मृतदेह ताब्यात देण्यात आला यावेळी प्रशांत भोसले यांच्या नातेवाईकानी मोठी गर्दी केली होती
घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपाधिक्षक बाबुराव महामुनी व पोलीस निरीक्षक प्रसाद यादव हे घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व तपासाच्या सूचना केल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहापूर पोलीस ठाणे कडून घटनास्थळी व संशयित आरोपी च्या घरासमोर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे