लसीकरण सक्तीसाठी शिये ग्रामपंचायतचा निर्णय
वार्ताहर / शिये
कोरोना प्रतिबंधक लसीबाबत जनतेत उदासिनता आहे. त्यामुळे ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी लसीकरुन घ्यावे यासाठी शिये ग्रामपंचायतने नो वॅक्सिन, नो दाखला धोरण राबवण्याचे ठरवले आहे. जे पात्र नागरिक लस घेणार नाहीत त्यांना ग्रामपंचायतमधून कोणत्याही प्रकारचा दाखला देण्यात येणार नाही. येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कोविड-19 दक्षता समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आणि लॉकडाऊन यशस्वी करणेसाठी शियेतील दक्षता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी गावात कोरोनाविषयक नियमांचे पालन होईल अशी दक्षता घेण्याचे ठरले. आशा सेविकांमार्फत घरोघरी रूग्ण सर्वेक्षण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आरोग्य यंत्रणा, महसूल, सामाजिक संस्था यांच्या समन्वयातून परगावाहून आलेल्या लोकांना अलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी राखी शिंदे यांनी लसीकरणाबाबत जागरुकता निर्माण करणारी माहिती दिली व गावात शंभर टक्के लसीकरण यशस्वी करण्याचे आवाहन केले. शिये गावातील लोकांना लसीकरणासाठी भुये प्रा. आ. केंद्रात जावे लगते. पण हे केंद्र आडवळणावर असल्याने लोकांना वाहतूक समस्या निर्माण होते. म्हणून लोक लस घेणे टाळत आहेत. त्यासाठी शिये उपकेंद्रात लसीकरण सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी ग्रा. पं. सदस्यांनी केली.