प्रतिनिधी / कोल्हापूर
शाहूपुरी कुंभार गल्लीतील ज्येष्ठ मूर्तीकार के. आर. कुंभार यांनी गणेशमूर्ती कामात स्वतःची एक कौशल्यपूर्ण शैली विकसित केली होती. त्यांनी ‘पोटल्या’ या नावाने बनविलेल्या गणेशमूर्तीकडे फक्त कोल्हापूरची नव्हे तर महाराष्ट्राची देणगी म्हणून पाहिले तर ते चुकीचे होणार नाही. त्यांनी 70 वर्षांच्या मूर्तीकामाच्या कारकिर्दीत 21 फुटी, 11 फुटीसह हजारो 6 फुटी गणेशमूर्ती बनविल्या. पण, त्यांचे मन नेहमी रंकाळावेश तालीम मंडळाच्याच गणेशमूर्तीतच सतत गुंतून राहिले. कारण त्यांनी या तालमीच्यानिमित्ताने आपल्या आयुष्यातील पहिली सार्वजनिक गणेशमूर्ती बनवली होती. तेव्हापासून म्हणजे यंदाच्या वर्षापर्यंत के. आर.अण्णा हे स्वतःहून तालमीची गणेशमूर्ती तयार करत होते. तालमीही या गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणूकीच्या उद्घाटनाचा मान फक्त के. आर.अण्णा यांनाच देत होते. तेव्हापासून गतवर्षापर्यंत म्हणजे 55 वर्षे म्हणजे गणेश आगमन मिरवणूकीच्या उद्घाटनाचा परंपरा सुरु होती. यंदाच्या ऐनगणेशोत्सावाच्या तोंडावरच म्हणजे चार दिवसांपूवी के.आर.अण्णा यांचे निधन झाल्याने रंकाळावेस तालमीच्या गणेश आगमन मिरवणूकीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची परंपरा खंडीत झाली आहे.
तसे पहायला गेल्यास गणेश आगमन मिरवणूकीचे उद्घाटन के. आर.अण्णा यांच्या हस्ते होत राहणं यात काय नवलं, असे वाटणे सहाजिकच आहे. परंतू याच मिरवणुकीच्या उद्घाटनाच्यानिमित्ताने मूर्तीकार के. आर.अण्णा आणि रंकाळावेश तालीम मंडळ यांच्यात गेली 55 वर्षे जी काही आपुलकी निर्माण झाली होती, त्याला तोड नाही. के. आर. अण्णा हे महाराष्ट्रातील एक दर्जेदार मूर्तीकार होते. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासूनच मूर्तीकामासाठी मातीत हात घातला होता. अल्पावधीतच ते एक तयारीचे मूर्तीकार बनले. गणेशोत्सवासाठी घरी बनविल्या जाणाऱया घरगुती गणेशमूर्ती कामात ते मदतीचा हात बनले. त्यांनी तरुण वयात म्हणजेच 1964 ला आपल्या आयुष्यातील पहिली सावर्जनिक गणेशमूती रंकाळावेस येथील रंकाळावेस तालीम मंडळासाठी तयार केली. त्यांच्या सुरेख मूर्तीकामांसह रंगकामावर तालमीचे कार्यकर्ते बेहद खुश झाले. इतकेच नव्हे तर त्याकाळी गणेशचतुर्थीच्या दिवशी तालमीने काढलेल्या गणेश आगमन मिरवणूकीचे उद्घाटन करण्याचा मानही के. आर.अण्णा यांनाच देऊन टाकला होता. हा मान पुढे पंरपराच बनले, याची के. आर.अण्णा यांना अजिबात कल्पना नव्हती. मात्र याचवेळी तालमीने मात्र दरवर्षीच्या गणेश चतुर्थीदिनी काढल्या जाणाऱया गणेश आगमन मिरवमूकीच्या उद्घाटनाचा मान के. आर.अण्णा यांनाच कायमस्वरुपी मान देण्याचे पक्के पेले होते. तेव्हापासून गतवर्षांपर्यंत म्हणजे गेली 55 वर्षे के. आर.अण्णा हेच तालमीच्या गणेश आगमन मिरवणुकीचे उद्घाटन करत होते.
गेल्या 55 वर्षाच्या कालावधीत शहर व जिह्यातील काही हजाराच्या आसपास मंडळांनी के. आर.अण्णा यांच्याकडून गणेशमूर्ती बनवून घेतल्या आहेत. गणेश चतुर्थीला ही मंडळे मूर्ती नेण्यासाठी त्यांच्याकडे येतच राहिले. के. आर. अण्णाही दिवसभर या मंडळाचे स्वागत करुन त्यांना मूर्ती देण्यात व्यस्त रहायचे. परंतू गणेशचतुर्थीच्या रात्री 8 ते 9 ही वेळ फक्त आणि फक्त रंकाळावेस तालमीसाठी ते राखून ठेवायचे. या तालमीने माझ्या मूर्तीकलेबाबत अतिवप्रेम दाखवून मला गणेश आमगन मिरवणूकीचा दिलेला मान हा माझ्यासाठी लाख मोलाचा आहे, असे के.आर अण्णा नेहमीच सांगायचे. वैशिष्टय म्हणजे शाहूपुरी कुंभार गल्लीतील कित्येक कुटुंबे रंकाळावेस तालमीच्या मिरवणुकीचे उद्घाटन अण्णांच्या हस्ते झाल्यानंतर गणेशमूर्तीला खीर-मोदकाचा नैवेद्य दाखवत होते. शिवाय जोपर्यंत गणेशमूर्तीला नैवेद्य दाखविला जाणार नाही, तोपर्यंत ही कुटुंबे रात्रीचे जेवणही घेत नव्हते. – संग्राम काटकर