शाहुवाडी / प्रतिनिधी
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील मलकापूर येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या जीप व बोलोरो गाडीला रत्नागिरीहुन कोल्हापूरच्या दिशेन निघालेल्या भरधाव टँकरने जोराची धडक दिल्यामुळे जीपजवळ उभ्या असलेल्या नथुराम शंकर गायकवाड (वय ३५ रा. निनाई परळे ता . शाहूवाडी) हे जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झाला. दोन्ही गाड्याचे दहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार रत्नागिरीहुन सुरज सुहास आवळे (रा. खानबाग जि. सांगली) हे टँकर मधील पेट्रोल खाली करून कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरून मिरज डेपोकडे जात होते. दरम्यान मलकापूर जवळील बौद्ध समाजाजवळ भरधाव टँकरने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कमांडर जीप व बोलेरो गाडीला जोराची धडक दिली. याच वेळी जीप जवळ नथुराम गायकवाड उभे होते. त्यांच्या अंगावर जीप पलटी होऊन यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. टँकरने दोन्ही गाड्यांना जोराची धडक दिल्यामुळे दोन्ही गाड्या रस्त्याकडेला पलटी झाल्या होत्या. दोन्ही गाड्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. रस्त्याकडेला असलेला विद्युत खांब पडून तारा तुटल्या आहेत. अपघात होताच नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले. टँकर चालक सुरज आवळे मद्यधुंद अवस्थेत होता. मृत नथुराम गायकवाड यांचे शवविच्छेदन मलकापूर ग्रामीण रुग्णालयात करून मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पाश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील करीत आहेत.