वार्ताहर / साळवण
कोल्हापूर गगनबावडा राज्य मार्गावर साळवण (ता.गगनबावडा) येथे वनविभाग कार्यालयाजवळ रस्त्याकडेला पडलेल्या झाडाची फांदी रस्त्यावर लटकत राहिल्यामुळे वाहतूकीस अडथळा करत असून या मार्गावरील वाहतूक धोक्याची बनली आहे.
साळवण वनविभाग कार्यालयाजवळ कोल्हापूर गगनबावडा राज्यमार्गावरील अपघात प्रवन क्षेत्र म्हणून निर्देशित केलेल्या धोकादायक वळणाजवळ पडलेल्या या झाडाची एक मोठी फांदी रस्त्याकडेला असणाऱ्या मार्गदर्शक फलकावर पडून लटकत राहिली असून या झाडाच्या फांदीचा अर्धा भाग रस्त्यात आल्यामुळे वाहतूकीस अडथळा ठरत आहे. दोन दिवसापूर्वी पडलेल्या झाडाची फांदी राज्यमार्गावरील वाहतूकीस अडथळा ठरत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
या राज्य मार्गावरील धोकादायक वळणाजवळच रस्त्याकडेला असणाऱ्या मार्गदर्शक फलकावर लटकणारी ही धोकादायक फांदी अपघाताला निमंत्रण देणारी आहे, तसेच यामार्गावरुन प्रवास करणाऱ्या मोठया वाहनांना ही फांदी चुकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. वाहतूकीस अडथळा ठरलेल्या या फांदीमुळे मोठा अपघात होण्यापूर्वी ही धोकादायक फांदी रस्त्यावरुन हटविणे गरजे बनले आहे.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ही धोकादायक फांदी तात्काळ हटवावी, अशी मागणी प्रवासी वाहनधारकांमधून केली जात आहे.