फिर्यादी प्रदीप जगताप यांच्या विरोधात अबुनुकसानीचा दावा करणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
संगणक व्यवहाराच्या वादातून मी आणि माझे ज्येष्ठ बंधू शैलेश लाटकर यांनी मिळून शिवीगाळ आणि मारहाण केल्याची खोटी फिर्याद प्रदीप जगताप यांनी यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. मूळातच जगताप आणि माझ्या बंधूमध्ये झालेल्या व्यवहाराची कोणतीही कल्पना मला नाही. तरीही जाणीवपूर्वक या प्रकारात माझे नाव गोवण्याचा प्रयत्न जगताप यांनी केला आहे. राजकारण आणि समाजकारण सक्रिय असणाऱया माझ्या परिवाराला बदनाम करण्यासाठी जगताप यांनी खोटी फिर्याद दिली असून त्यांच्या मागे वेगळे सूत्रधार आहेत. येत्या दोन तीन दिवसांत जगताप यांनी माफी मागितली नाही, तर त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी दिला आहे.
या संदर्भात लाटकर यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना निवेदन सादर केले असून खोटी फिर्याद देणाऱया प्रदीप जगताप यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे ः गेली पंधरा वर्षांपासून मी आणि माझे बंधू शैलेश विभक्त राहतो. त्यांच्या व्यवसायाशी माझा कसलाही संबंध नाही. सोमवार 1 मार्च रोजी जगताप आणि माणगावे नामक गृहस्थ माझ्या शिवाजी पार्क येथील घरी आले. त्यावेळी माझे बंधू शैलेश आमच्या समावेत नव्हते. मी आणि माझ्या पत्नी ऍड. सूरमंजिरी गेल्या पंचवीस दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह होतो. दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहोत. जगताप यांनी मला शैलेश यांच्याबरोबर संगणक व्यवहारातून आर्थिक देण्या-घेण्याविषयी सुरू असलेल्या वादाची माहिती दिली. तो आपण लक्ष घालून सोडविण्याची विनंती केली.
त्यावेळी मी शैलेश माझा भाऊ असला तरी आम्ही विभक्त राहतो. त्याच्या व्यवहारांची मला कल्पना नाही. विश्रांतीचा काळ संपल्यानंतर आठ दहा दिवसांची प्रत्यक्ष शैलेश यांच्याशी चर्चा करून आपल्याला कळवितो, असे मी जगताप यांना सांगितले. त्यानंतर शैलेश यांना फोन लावून जगताप आल्याची माहिती दिली. यानंतर जगताप व माणगावे निघून गेले. त्यानंतर त्यांनी 2 मार्च मी त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याची फिर्याद दिली. मी आणि पत्नी ऍड. सूरमंजिरी लाटकर गेली वीस वर्षे राजकारण, समाजकारणात सक्रिय आहोत. राष्ट्रवादी पक्षाचे कार्य करत आहोत. आगामी महापालिका निवडणुकीत लढणार आहोत. त्यामुळे राजकीय हेतूने आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी जगताप यांनी खोटी फिर्याद दिली आहे. त्यामुळे नाहक बदनामी आणि मानसिक त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे. जगताप यांनी दोन तीन दिवसांत माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला जाईल, असेही लाटकर यांनी निवेदनात म्हटले.
सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध
जगताप आणि माणगावे माझ्या घरी आले होते. त्या काळातील सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध आहे. जर मी त्यांना मारहाण केली असती तर कॅमेऱयात ती घटना दिसली असती. त्यावरून जगताप यांचा हेतू स्पष्ट होतो, असे लाटकर यांनी म्हटले आहे.