प्रतिनिधी / इचलकरंजी
राज्याच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योग व्यवसायाला ठेंगाच मिळाला आहे. वीजदरातील सवलत पाच टक्के अनुदान, त्याचबरोबर टेक्स्टाईल पार्कसाठी विविध घोषणा याबाबत कोणत्याच गोष्टीची तरतुद राज्याच्या अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे देशात शेती पाठोपाठ सर्वाधिक रोजगारभिमुख व्यवसाय असलेल्या या व्यवसायाकडे महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.
राज्यात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. मालेगाव, भिवंडी, सोलापूर, इचलकरंजी विकास या विविध भागात यंत्र मागाचे मोठे जाळे आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध झाला आहे. हळूहळू मूल्यवर्धित रोजगाराला ही आता बळ मिळाले आहे. यातून महिलांना मोठ्या प्रमाणात गारमेंट व्यवसायात काम मिळू लागले आहे. मात्र जागतिक स्पर्धा आणि अन्य राज्यातील सवलतीच्या तुलनेत महाराष्ट्रातील सवलती कमी असल्यामुळे या वर्षीच्या अर्थसंकल्पात या व्यवसायाला काय दिलासा मिळणार याकडे लक्ष लागून राहिले होते.
राज्य शासनाने या व्यवसायासाठी पाच टक्के व्याज अनुदानाची तरतूद केली आहे. मात्र यातील बाबी अत्यंत किचकट आहेत. याबाबी कमी करण्याची गरज होती तसेच साध्या यंत्रमागाचे अस्तित्व टिकवण्यासाठी व्यवसायाला लागणार्या वीजदरात आणखीन एक रुपयांची सवलत मिळावी अशी ही मागणी होती. आधुनिक यंत्रमागाला यापूर्वीच प्रति युनिट 75 पैसे अनुदान देण्याची घोषणा झाली होती. मात्र त्याबाबत कोणतीच तरतूद अद्यापही झालेले नाही त्यामुळे यासाठी ही तरतूद होईल अशी अपेक्षा होती. व्यवसायाला चालना देण्यासाठी टेक्स्टाईल पार्क विविध सुविधांची गरज होती मात्र याकडेही या अर्थसंकल्पात दुर्लक्ष झाले आहे. रोजगारभिमुख असलेल्या या व्यवसायाकडे राज्य शासनाने पुन्हा एकदा पाठ फिरवली आहे. त्यामुळे या व्यवसायातून नाराजीचा सूर आहे.
शासन या उद्योगासाठी काही सवलती देईल अशी आशा होती मात्र वस्त्रोद्योग या अर्थसंकल्पात कोणतीच तरतूद झाली नाही. महिलांना व्याजदरात सवलती सह अन्य मागण्या बाबत विचार होणे आवश्यक होते. – आमदार प्रकाश आवाडे, इचलकरंजी |
केंद्रशासनाने देशात सात ठिकाणी टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने याबाबत काहीतरी धोरण आखण्याची गरज होती. तसेच वीजदरातील सवलत व अनुदान याबाबत कोणतीच तरतूद या अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे एकूणच वस्त्रोद्योगबाबत शासनाने दुर्लक्ष केले आहे. – विनय महाजन, अध्यक्ष यंत्रमागधारक जागृती संघटना |