युवराज भित्तम / म्हासुर्ली
राधानगरी शहरातील जुनी पेठ येथील इयत्ता आठवी शिकणाऱ्या क्रांती सागर सुतार याने कोरोना व्हायरस पार्श्वभूमीत लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असताना ही घरीच ऑनलाईन शिक्षण घेत उरलेल्या वेळेचा चांगला उपयोग करत टाकाऊ कागदी पुट्टे व इतर वस्तुचा वापर करत वेगळा छंद जोपासत वाहने, जहाज, विमाने, मोटरसायकल यांच्या हुबेहुब प्रतिकृती बनविल्या आहेत.
जगभरात मृत्युचे थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र सर्व व्यवहार बंद असल्याने शैक्षणिक संस्था पण बंद आहे. त्यामुळे मुले घरातच बसून आहेत. तर अनेक मुले दिवस दिवस भर मोबाइलचा अतिवापरत करत धोकादायक ऑनलाईन गेम खेळणे, टिव्ही पाहणे अशात रमत आपले सर्वागिन नुकसान करत आहेत. पण याला ही काही विद्यार्थी अपवाद ठरत असून ऑनलाईन शिक्षण घेण्या बरोबरच आपल्या उपजत शारिरीक इतर कला गुणांना वाव देत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
अशाच पद्धतीने राधानगरी विद्यालयाचा विद्यार्थी व राधानगरी शहरातील जुनी पेठ येथे राहणारा ध्येय वेडा,होतकरून व नवीन कल्पकता मांडत त्या पूर्ण करण्याकडे कल असलेला क्रांती सुतार यांनी आपल्या दिवसभराच्या उरलेल्या वेळेचा सदुपयोग करत टाकावू कागदी पुट्टे,लाकूड व इतर टाकाऊ वस्तु यांचा वापर करत जहाज, लढाऊ जहाज, रिमोट वर चालणारी चारचाकी गाडी, मोटरसायकल यांच्या छोट्या – छोट्या प्रतिकृती बनविल्या आहेत. त्यामुळे क्रांतीचे सर्व स्तरातून गोड कौतुक होत आहे. तसेच यापुढे जाऊन क्रांतीने एकप्रकारे विचारांची क्रांती घडवत वन्यप्राण्यांच्या पासून पिकांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने शेतात येणाऱ्या वन्यप्राण्यांना कोणतीही इज्जा न होता भिती दाखवून पिटाळून लावण्यासाठी त्याने एक बंदूकीची प्रतिकृती तयारी केली असून यात फटाक्यांचा वापर केला जातो. त्यामुळे कोणत्याही प्राण्याला त्याची इजा न होत बंदूकीतून निघणाऱ्या धुर व आवाजाला भिऊ प्राणी शेतातून पळून जाऊ शकतात. असा क्रांतीचा दावा आहे.
अशा वस्तू प्रकारे नाविन्य पूर्ण वस्तुच्या प्रतिकृती तयार करण्याचा क्रांतीला लहान पणा पासूनच छंद असल्याचे त्याचे वडील सागर सुतार यांनी सांगीतले. सध्या या विविध प्रतिकृती तयार करण्यासाठी वडील सागर, चुलते सचिन सुतार, आई, चुलती, आजी, आजोबा, व शाळेतील शिक्षकांचे प्रोत्साहन मिळाले असल्याचे त्याने बोलताना नमूद केले.