जिल्हा नियंत्रण कक्षात नातेवाईकांची धाव, जिल्हा प्रशासनाचा उत्पादक कंपन्यांशी संपर्क
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारीही रेमडेसीवीर न मिळाल्याने नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्षात धाव घेतली. तरीही रूग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसीवीरसाठी प्रतिक्षा करावी लागली. जिल्हा प्रशासनाने उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधला. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी थेट कंपन्यांशी संपर्क साधला. त्यामुळे शुक्रवारी काही प्रमाणात ही इंजेक्शन मिळण्याची शक्यता वाढली आहे.
राज्यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसीवीरचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना रूग्णांसाठी ते आवश्यक मानले जात आहे. पण उत्पादन कमी असल्याने त्याचा तुटवडा जाणवत आहे. राज्याला रेमडेसीवीरचा पुरवठा करणाऱया कंपनीचा हैदराबाद येथील प्लँट तांत्रिक कारणाने बंद आहे. तरीही येत्या 8 दिवसांत रेमडेसीवीर उपलब्धे होईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यात रेमडेसीवीर उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. बुधवारीही या कक्षाकडे नातेवाईकांनी संपर्क साधला होता. गुरूवारीही अनेकांनी संपर्क साधला. पण रेमडेसीवीर मिळत नाहीत, असे सांगण्यात आले. सांयकाळी जिल्हा नियंत्रण कक्षांशी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी संवाद साधला. त्यांनीही रेमडेसीवीर उत्पादक कंपन्यांशी थेट चर्चा केली. त्यातून शुक्रवारी प्रशासनाला काही प्रमाणात रेमडेसीवीर मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.