पाच तालुक्यांसाठी 12 हजार क्विंटल मंजूरच : पुढील महिन्यात होणार 12 लाख लाभार्थ्यांना वाटप
प्रवीण देसाई / कोल्हापूर
जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील 12 लाख 73 प्राधान्य रेशन लाभार्थ्यांना पुढील महिन्यासाठी 12 हजार 73 क्विंटल मका मंजूर झाला आहे. सध्या रेशनवर मिळत असलेल्या 3 किलो गहूमधील 1 किलो प्रमाण करुन त्याऐवजी एक किलो मक्याचे वाटप केले जाणार आहे. याला रेशनदुकानदारांचा विरोध असून मक्याऐवजी रेशनवर मंजूर असलेला गहूच पूर्णप्रमाणात द्यावा, अशी मागणी होत आहे.
किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील मका शिल्लक राहीला आहे. त्यामधील मक्यातून 12 हजार 73 क्विंटल मका कोल्हापूर जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे. करवीर, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल तालुक्यातील 12 लाख 77 हजार लाभार्थ्यांना मका पुढील महिन्यात मिळणार आहे. वरील पाच तालुक्यापुरताच हा मका मंजूर झाला असून तो गोदामांमध्ये दाखल झाला आहे. सध्या रेशनवर प्रति व्यक्ती 3 किलो गहू दिला जातो. यामधील एक किलो प्रमाण कमी करुन त्याऐवजी 1 किलो मका लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.
रेशनवर गव्हाचे प्रमाण कमी करुन मका दिला जाणार असल्याने रेशन दुकानदारांचा याचा विरोध आहे. यामुळे नाहक रेशन ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तसेच रेशनग्राहक व दुकानदार यांच्यात वादावादीचे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे पूर्णप्रमाणात गहूच दिला जावा, असा सूर रेशनदुकानदारांमधून उमटत आहे.
पाच तालुक्यांसाठी मंजूर मका असा… तालुका लाभार्थी संख्या मंजूर मका (क्विंटलमध्ये) करवीर 320155 3200 पन्हाळा 179019 1790 हातकणंगले 294685 2946 शिरोळ 249291 2492 कागल 164551 1645 एकूण 1207701 12073 |
राज्य सरकारने थेट शेतकर्यांकडून मका खरेदी केला आहे. जिह्यातील पाच तालुक्यांतील रेशनग्राहकांना मका पुढील महिन्यासाठी मंजूर झाला आहे. हा मका फक्त पुढील एका महिन्यासाठीच आहे. सध्या मिळत असलेल्या गव्हातील एक किलो कमी करुन त्याऐवजी एक किलो मका रेशनवर दिला जाणार आहे.
-दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी
मका ही कोल्हापूरची खाद्य संस्कृती नाही. रेशन ग्राहकांकडून गव्हालाच जास्त मागणी आहे. त्यामुळे रेशनवर मका वाटप केल्यास रेशनदुकानदारांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे ग्राहक व रेशनदुकानदार यांच्या वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांचा मका वाटपाला विरोध आहे.
-रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर रेशन दुकानदार संघटना