प्रतिनिधी / घुणकी
शासनाच्या आरोग्य खात्याकडून देण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. मात्र भादोले आरोग्य केंद्राच्या आखत्यारित पाच गावात नागरिकांचा याला थंडा प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना दारोदारी फिरून लस घेण्यासाठी लोकांना एकत्र करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. लसीकरणानंतर होणाऱ्या किरकोळ तक्रारीचा समाज माध्यम व लोकांच्यातून होणाऱ्या चुकीच्या चर्चेमुळे लोकांत भितीचे वातावरण आहे. ते दूर करणेचे गरजेचे असून यासाठी आरोग्य खात्याबरोबर सामाजिक राजकिय संघटनांनी जनजागृती करुन लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
भादोले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत भादोले, किणी, घुणकी, लाटवडे, वाठार ही पाच गावे येतात या गावामधील ४५ वर्षाच्या पुढील ६२०९ नागरिक शासनाच्या लसीकरण निकषात बसतात. ३ मार्चपासून सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेत आज अखेर ३७९२ नागरिकांनी लस घेतली असून अद्यापही अर्ध्याहून अधिक लोकांनी आरोग्य खाते, अंगणवाडीसेविका या सह ग्रामपंचायत प्रशासनाकडून घरोघरी जावून लोकांना लसीकरणासाठी प्रवृत करण्याचा प्रयत्न करूनही अद्याप थंडा प्रतिसाद असलेचे चित्र आहे. अशिक्षित लोकाबरोबर बहुतांश शाळामधील शिक्षक, शासकिय निमशासकिय कर्मचारी यांनीही लसीबाबतच्या अपप्रचारामुळे पाठ फिरवल्याने आरोग्य खातेला लसीकरणासाठी दारोदार फिरूनही अपेक्षित प्रतिसाद नसलेचे चित्र आहे .