वार्ताहर/खोची
वारणा धरण व पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे वारणा नदीला पूर आला आहे.चांदोली येथील वारणा धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदी पाणीपातळीत सातत्याने मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार राजूबाबा आवळे यांनी खोची ता.हातकणंगले येथील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या. तसेच संभाव्य पूरस्थितीची माहिती घेऊन नदीकाठच्या लोकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी उपसरपंच अमरसिंह पाटील,सदस्य एम.के.चव्हाण, डॉ. अनिल पाटील तसेच भैरवनाथ पवार, शिवाजी पाटील, सुनील पाटील, शंकर जांभळे, हणमंत पाटील,वडगांव मंडलाधिकारी गणेश बर्गे आदी उपस्थित होते.
सततच्या पावसाने व चांदोली धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. संभाव्य महापुराचा धोका ओळखून आमदार आवळे यांनी खोची येथे येऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी पूरग्रस्तांच्या समस्या मांडल्या.तसेच कोरोना लॉकडाऊन काळातील लाईट बिल माफ करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी कोरोना आणि महापूर याबाबत प्रशासन सतर्क आहे अशी ग्वाही दिली.
दरवर्षी महापुरामुळे खोची ग्रामस्थांचा व भैरवनाथ मंदिराचा संपर्क तूटला जातो. तसेच नदीपलीकडे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना महापुराच्या काळात शेतीकडे दुर्लक्ष करावे लागते. यासाठी कायमस्वरूपी होडी ( नाव) खोची येथील नदीपात्रासाठी मिळण्याची मागणी कित्येक दिवसांपासून आहे.याचा उल्लेख करताच आ. राजूबाबा आवळे यांनी तहसीलदार प्रदीप उबाळे यांचेशी संपर्क साधून तात्काळ होडी उपलब्ध करुन देण्याची आदेश दिले.