प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या शनिवार 17 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर दरम्यान होणार आहेत. 149 परीक्षा तीन सत्रात परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठाने सुरु केली आहे. दरम्यान गुरुवारी कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी परीक्षा विभागाची बैठक घेवून कामाचा आढावा घेतला. तसेच पुणे येथील कंपनीच्या वतीने ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक असणाऱया सॉफ्टवेअरचा डेमो कर्मचाऱयांना दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे नियोजन राज्य सरकार व विद्यापीठ प्रशासनाने सुरु केले आहे. 31 ऑक्टोंबर पर्यंत परीक्षा घेवून 10 नोव्हेंबर पूर्वी निकाल लावण्याच्या सुचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. यानुसार 1 ऑक्टोंबर पासून पुर्नपरीक्षार्थी तर 10 ऑक्टोंबर पासून नियमीत अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले होते. मात्र लेखणी बंद आंदोलन तसेच ऑनलाईन सॉफ्टवेअरची कमतरता यामुळे परिक्षा विभागाचे नियोजन कोलमडले होते.
तीन सत्रात होणार परीक्षा
अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठ परीक्षा विभागाने कंबर कसली आहे. 31 ऑक्टोंबर पर्यंत परिक्षा घेवून 10 नोव्हेंबर पुर्वी निकाल लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे एका दिवसांत तीन सत्रात परिक्षा घेण्याचे नियोजन परीक्षा विभागकडून सुरु आहे. सकाळी 10 ते 11, 1 ते 2, 4 ते 5 अशा तीन सत्रात ही परिक्षा घेवून विविध विषयांच्या परिक्षा पुर्ण केल्या जाणार आहेत.
सॉफ्टवेअरध्ये काही तांत्रिक बदल
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर पुरविणारी पुण्यातील कंपनी निश्चीत झाली. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून परीक्षा मॉक टेस्ट, परीक्षेची तयारी, परीक्षादरम्यानची कार्यवाही, परीक्षांचे गुणपत्रक याबाबतची कार्यवाही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होणार आहे. सॉफ्टवेअर हाताळणी बाबतचे प्रशिक्षण विद्यापीठ परीक्षा विभाग व महाविद्यालयातील संबंधीत कर्मचाऱयांना देण्याचे काम कंपनीच्या वतीने सुरु करण्यात येणार आहे. मात्र गुरुवारी झालेल्या बैठकीदरम्यान परीक्षा मंडळाच्या सदस्यांनी सॉफ्टवेअरमध्ये काही बदल सुचविले आहेत. हे बदल केल्यानंतर संबंधीत कर्मचाऱयांना सॉफ्टवेअरचे ट्रेनिंग देण्यात येणार आहे.
अद्याप 13 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी बाकी
विद्यार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन कि ऑफलाईन पद्धतीने देणार याची निवड करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने ऑप्शन फॉर्म भरण्याची व्यवस्था संकेतस्थळावर करण्यात आली आहे. गुरुवार अखेर 74 हजार विद्यार्थ्यांनी हा ऑप्शन फॉर्म भरला असून 13 हजार फॉर्म भरलेला नाही. या विद्यार्थ्यांनी तात्काळ हा फॉर्म भरावा असे आवाहन परिक्षा नियंत्रक डॉ. गजानन पळसे यांनी केले.