प्रतिनिधी / शाहुवाडी
मलकापूर शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाने चांगलाच कारवाईचा बडगा उगारून चक्क पोलीस चौकीतच स्वॅब तपासणी सुरू केल्याने अनेकांची धावपळ उडाली. या कारवाईमुळे विनाकारण फिरत असलेल्यांना चांगलाच लगाम बसला आहे. पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई.
शाहूवाडी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. वारंवार सूचना देऊन देखील विनाकरण फिरत असलेल्यांना लगाम बसत नाही मलकापूर या प्रमुख बाजारपेठेमध्ये गर्दीचा महापूर सतत वाढतच आहे. अशांना अटकाव घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने शुक्रवारी बाजार दिवशी चांगलीच कारवाईची मोहीम उघडली. मलकापूर शहरातील पोलीस चौकीतच विनाकारण फिरत असलेल्यांची तपासणी केली. या तपासणी मोहिमेविषयी चाहूल लागताच अनेकांनी मलकापूर शहराच्या बाहेरूनच काढता पाय घेतला.
पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्यासह शाहूवाडी पोलीस कर्मचाऱ्यांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्याची चांगलीच चर्चा झाली. यापुढेही अशीच कारवाईची मोहीम सुरू राहणार असून विनाकारण रस्त्यावर आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही पोलीस प्रशासनाच्या वतीने दिला आहे. दरम्यान आज तपासणी केलेल्यांना मात्र चांगलाच लगाम बसला असून तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबतीत प्रशासनाने आता चांगलीच सतर्कता घेतली आहे.