मिरजकर तिकटी येथे अचानक घेतलेल्या अँटीजेन टेस्टमधून स्पष्ट 143 जणांचे अहवाल निगेटिव्ह,
प्रतिनिधी / कोल्हापूर
संचारबंदी असताना भाजी खरेदीसाठी आले आहे, वडीलांची औषधे घेण्यासाठी आले आहे, किराणामाला नेण्यासाठी आले आहे, अशी कराणे सांगून विनाकारण फिरणाऱ्या 6 जण कोरोना बाधित असल्याचे सोमवारी आढळून आले. महापालिकेच्या मोबाईल व्हॉन अँटीजेन टेस्ट पथकाने मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी येथे केलेल्या तपासणीतून हे समोर आले आहे.
शहरामध्ये कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. संचार बंदी असतानाही भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. काहींकडून विनाकारण फिरणे सुरूच आहे. अशा लोकांना वटणीवर आणण्यासाठी महापालिकेने मोबाईल व्हॅनच्या पथकाद्वारे गर्दीच्या ठिकाणी जाऊन थेट त्यांची रॅपिड ऍन्टीजन टेस्ट केली जात आहे. तसेच भाजी विक्रेते, खरेदीसाठी येणारे नागरिक, दुकानांतील कर्मचारी यांची तपासणी होत आहे. पथकाकडून मोहिमेच्या तिसऱया दिवशी मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी येथे तपासणी केली.
यावेळी काहींनी स्वत:हून रांगेत उभे राहून तर काहींना पथकातील कर्मचाऱयांनी अडवून तपासणी करण्यास भाग पाडले. 149 जणांची तपासणी केली. त्यापैकी 6 जण कोरोना बाधित सापडले. यामध्ये शिवाजी पेठेतील 2, गुजरीतील 2 आणि पाचगांव शांतीनगरातील 1, किणी वठार येथील 1 यांचा समावेश आहे. पंचगंगा हॉस्पिटलचे पथक, महापालिकेचे मार्केट ऑफीसर राजेंद्र पाटील, अतिक्रमण निर्मुलन पथक प्रमुख पंडित पोवार यांच्यासह केएमटीचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.