वार्ताहर/उचगाव
शौचालय बांधण्यासाठी माहेरहून आजीकडून तीस हजार रुपये घेऊन ये व मुलगी झाली म्हणून वारंवार अपमानित करत घराबाहेर काढून विवाहितेचा संगनमताने छळ करणाऱ्या पती, सासू-सासरे, चुलत सासू-सासरे व दीर अशा सहा जणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पती जयकुमार बाबासाहेब कांबळे, सासरे बाबासाहेब कृष्णात कांबळे, सासू मंगल कांबळे, दीर विजयकुमार कांबळे, चुलत सासु उज्वला पोपट कांबळे, चुलत सासरे पोपट कृष्णात कांबळे ( सर्व रा. आंबेडकर चौक, गडमुडशिंगी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पीडित विवाहिता सौ. रमा जयकुमार कांबळे( वय 20 रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांनी याबाबतची फिर्याद दिली. पती जयकुमार कांबळेसह हे सहा जण संगनमताने माहेरहून आजीकडून तीस हजार रुपये आणण्यासाठी व मुलगी झाली म्हणून वारंवार रमास अपमानित करून मानसिक शारीरिक छळ करत असत. तिला घराबाहेर काढून तिला त्रास देत होते. हा प्रकार मे 2019 ते फेब्रुवारी 2020 अखेर सुरु होता. अखेर विवाहितेने फिर्याद दिल्याने गांधीनगर पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा प्रथम खबरी अहवाल न्यायालयात सादर करण्याची तजवीज गांधीनगर पोलिसांनी केली आहे. अधिक तपास हवालदार विराज डांगे करत आहेत.