वार्ताहर / उचगांव
गडमुडशिंगी (ता.करवीर) येथील गावभागातील आडाजवळ असणाऱ्या ओढ्यात विद्युत खांबावरील तार तुटून पाण्यात पडल्याने शॉक बसून सासू व सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली.
मीना विष्णू येडेकर (वय ५५), अनुराधा महेश येडेकर (वय २७ दोघेही रा.गडमुडशिंगी) असे मृत झालेल्या सासू व सुनेचे नाव आहे. दरम्यान, ही घटना समजल्यावर घटनास्थळी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. महावितरणच्या गलथान कारभारामुळे शॉक लागून दोघींचा हकनाक बळी गेल्याच्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी दिल्या. गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांची समजूत काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालय येथे पाठविले.
या ओढ्यात नेहमी वीस पंचवीस महिला कपडे धुण्यासाठी येतात. पण सणजवळ आल्याने गर्दी कमी होती म्हणून मोठी दुर्घटना टळली. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही दूर्दैवी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.