संजीव खाडे / कोल्हापूर
गेली तीन वर्षे प्रलंबित असलेली कोल्हापूर शहराचा नवीन सुधारित विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन ः डीपी) तयार करण्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. कृषी क्षेत्राच्या आधारावर सधन बनलेल्या कोल्हापूर शहराच्या नवीन डीपीत औद्योगिक (इंडस्ट्रीज) अणि वाणिज्य (कॉमर्स) क्षेत्राला प्राधान्य आणि चालना देण्याच्या दृष्टीने नियोजन आहे. त्याचबरोबर आगामी पन्नास वर्षांत होणाऱया विविध क्षेत्रातील बदलाचा विचार करण्यात येणार आहे. दोन भागात डीपी तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही केला जाणार आहे.
1966 मध्ये कोल्हापूर नगरपालिका असताना पहिला डीपी तयार झाला होता. त्यानंतर 1999 मध्ये दुसरा डीपी तयार करण्यात आला. पण त्यावेळी काही हरकती, तक्रारी, आक्षेपामुळे त्याची अंमलबजावणी करण्यास 2000 वर्ष उजाडले. गंभीर तक्रारी दूर ठेवून उर्वरीत डीपीच्या अंमलबजावणीचे आदेश तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिले. या डीपीची मुदत 2020 मध्ये संपली. त्Îाआधी 2017 मध्ये महापालिकेच्या सभागृहाने 2020 ते 2040 या वीस वर्षांच्या काळासाठी नवीन डीपी तयार करण्यासंदर्भातील ठराव मंजूर केला. त्यासाठी डीपी युनिट आणणे, निविदा प्रक्रिया राबविणे याला मंजुरी दिली.
दरम्यानच्या काळात डीपी युनिटचे काम करण्यासाठी विशेष अधिकारी नसल्याचे अडचणी निर्माण झाल्या. दोन वर्षांपूर्वी डीपी युनिट आल्यानंतरही त्यातील कर्मचाऱयांचा पगार सुरू झाला पण प्रत्यक्षात कामाचा पत्ता नव्हता. एजन्सी नेमण्याचे काम तत्कालिन पदाधिकाऱयांच्या आडमुठे पणामुळे आजही जैसे थे आहे. आता महापालिकेवर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचे राज्य आहे. लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप नाही. पालकमंत्री सतेज पाटील यांनी महापालिकेच्या नगररचना विभागासाठी विशेष घटक, विशेष योजना राबविण्यासाठी उपसंचालक नियुक्तीसाठी पुढाकार घेतला. धनंजय खोत यांची शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे. याआधी त्यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक म्हणून काम पाहिले आहे. मुळचे शिरोळ तालुक्यातील असलेल्या खोत यांनी कोल्हापूर शहराचा इतिहास, भूगोल माहिती आहे. त्यांनी नवीन डीपी तयार करण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे नवीन डीपीसंदर्भात माहिती देताना उपसंचालक धनंजय खोत म्हणाले, विद्यमान भूवापर नकाशा (एक्झिटिंग लँड युज मॅप ः ईएलयु) आणि प्रस्तावित भूवापर नकाशा (प्रपोज्ड लँड युज मॅप ः पीएलयु) अशा दोन भागात डीपी तयार करण्यात येणार आहे. ईएलयुमध्ये जीआयएससारख्या (जिऑग्राफिकल इन्फॉमेशन सिस्टीम) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुगल मॅपच्या आधारे जागेवरील प्रत्यक्ष असणारी स्थिती, बारीकसारीक नोंदी डीपीच्या मॅपमध्ये घेण्यात येणार आहे. कोल्हापूर महापालिकेला आगामी काळात उपयुक्त ठरेल असा हा डीपी मॅप असेल.
पीएलयु तयार करताना कोल्हापूर शहराची पुढील पन्नास वर्षात होणारी वाढ कशी असेल याचा विचार केला जाणार आहे. कोल्हापूर शहर कृषी क्षेत्रामुळे विकसित आणि सधन झाले आहे. भविष्यात या विकासाला औद्योगिक आणि वाणिज्य क्षेत्राची जोड मिळाली तर कोल्हापूर महापापालिका शहर आणखीन पुढे जाईल. डीपीमध्ये या दोन्ही क्षेत्रांना चालना देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. या प्रक्रियेत कुणावरही अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेतली जाणार आहे. नव्याने लागू झालेल्या युनिफाईड बायलॉजचा वापरही डीपी तयार करताना केला जाणार आहे, असेही खोत यांनी सांगितले.
नवीन डीपीत या गोष्टींवर सर्वाधिक राहणार भर
नवीन डीपीमध्ये तयार करताना शहरातील कोणत्या भागातील लोकसंख्या वाढली आहे, कोणत्या भागात वाहतूक, दळणवळण वाढले आहे. पार्किंगचा प्रश्न, पूर्वीच्या रस्त्यांचे जाळे (रोडनेटवर्क) आणि सध्या त्या रस्त्यांची स्थिती, बाग, शाळा, दवाखाने, नाटÎगृह यांच्यासाठी असणाऱया आरक्षित जागा, प्रत्यक्षात स्थिती आणि भविष्यातील गरज, गावठाण, उपनगरातील स्थिती आदीचा विचार केला जाणार आहे.
विद्यमान भूवापर नकाशा तयार आणि प्रस्तावित भूवापर नकाशा तयार करणे दोन अडीच वर्षात शक्य आहे. अचूक व कोणावरही अन्याय न करणारा डीपी तयार करण्याचे प्रयत्न असतील.
-धनंजय खोत, उपसंचालक नगररचना विभाग, कोमनपा, (विशेष योजना, विशेष घटक)