प्रतिनिधी / कोल्हापूर
येत्या सोमवार 8 फेबुवारीपासून शहरातील रस्त्यावरील बेकायदेशीर केबीन्ससह अतिक्रमणे काढण्याची धडक मोहीम महापालिकेने आखली आहे. या संदर्भात अनधिकृतरित्या अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱयांना अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, सध्या महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे या रजेवर असल्याने सोमवारी होणारी कारवाई मंगळवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कारवाईसंदर्भात फेरीवाले संघटनांनी शुक्रवारी आमदार चंद्रकांत जाधव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कारवाई रोखण्याची मागणी केली. त्यावर आमदार जाधव यांनी महापालिकेच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून चर्चा केली.
महापालिकेने शहरात सर्व्हे केलेले 6210 फेरीवाले आहेत. त्यातील 3367 फेरीवाल्यांचे व्हेरिफिकेशन झाल्याने ते अधिकृत आहेत. तर सर्व्हे होऊनही व्हेरिफिकेशन झाले नसलेले 2843 फेरीवाले आहेत. त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे, पुरावे, दाखले पुरवले नसल्याने त्यांना सध्या महापालिका अनधिकृत मानते. 1992 मध्ये महापालिकेने फेरीवाल्यांसाठी लायसन्स अर्थात परवाना सुरू केला. त्यानंतर 2010 मध्ये लायसन्स पद्धत रद्द करण्यात आली. त्या ऐवजी रमा फी सुरू केली. 2011 मध्ये फेरीवाल्याचे सर्व्हेक्षण सुरू केले. 2014 मध्ये बायमॅट्रिक पद्धत सुरू केली. त्यानंतर फेरीवाले संघटा आणि कृती समितीने सर्व्हेक्षणासाठी मुदत वाढवून घेतली. नोव्हेंबर 2020 पर्यंत ही मुदत होती. तो पर्यंत सर्व्हे झालेल्या फेरीवाल्यांना अधिकृतच्या कक्षेत घेण्यात आले. तरीही अजून बऱयाच जणांनी नोंदणी केलेली नाही. व्हेरिफिकेशन करून घेतलेली नाही. मात्र त्याचा व्यवसाय सुरू आहे. त्यांनी केबीन थाटली आहेत. त्यामुळे ती अशा अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होणार आहे.
फेरीवाल्यांनी घेतली आमदार जाधवांची भेट
अतिक्रमण कारवाईच्या पार्श्वभूमीवर फेरीवाले कृती समितीची आर.के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी बैठक झाली होती. त्यामध्ये कारवाई थांबविण्याबरोबरच चुकीची कारवाई करू नये, अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी फेरीवाले संघटनेच्या पदाधिकाऱयांनी आमदार चंद्रकांत जाधव यांची भेट घेऊन त्यांना कारवाई थांबविण्याची विनंती केली. त्यावर आमदार जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. फेरीवाले धोरण जाहीर झाले नसल्याने कारवाई करताना लवचिक धोरण स्वीकारण्यात यावे. शहराचे विद्रुपिकरण टाळण्याबरोबरच नागरिक, पर्यटक, भाविका यांना त्रास होऊ नये यासाठी कारवाई आवश्यक असली तरी फेरीवाल्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना आमदार जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त देसाई यांना केल्या.
प्रशासक डॉ. बलकवडे कारवाईवर ठाम
दरम्यान, प्रशासक डॉ. बलकवडे रजेवरून परतल्यानंतर सोमवारी फेरीवाल्यांबरोबर बैठक होईल. त्यानंतर अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात येईल. प्रशासक डॉ. बलकवडे या कारवाईवर ठाम आहेत. पण त्याआधी फेरीवाल्यांबरोबर चर्चा होईल त्यानंतर कारवाई सुरू करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.