संग्राम काटकर / कोल्हापूर
शहरातील काही अपवाद वगळता बहुतांश बडय़ा मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात 21 फुटीऐवजी 4 फुटांपर्यंतच्याच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे निश्चित केले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊनच या मंडळांनी राज्य सरकारची नियमावली जाहीर होण्याआधीच लहान गणेशमूर्ती बसविण्याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. मात्र 21 फुटी गणेशमूर्तीं बसविणाऱया दोन ते तीन मंडळांचा निर्णय मात्र अद्याप झालेला नाही.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वीच या बडय़ा मंडळांनी आपापल्या मूर्तीकारांना यंदाच्या वर्षी 21 फुटी गणेशमूर्ती तयार करू नये, अशी विनंती केली होती. मूर्तीकारांनी ही परिस्थितीची जाण ठेवत या विनंतीला सहकार्याचा भावनेने स्वीकारले आहे. गणेशोत्सवात 21 फुटी गणेशमूर्तीचे भलेही आकर्षण राहणार नसले तरी या बडय़ा मंडळांनी समाजाप्रती काहीतरी देणे लागते, या भावनाने रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, गरजूंना धान्य, मास्क, सॅनिटायझर व मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप आदी उपक्रम राबविण्याचा संकल्प सोडला आहे.
मार्च महिन्यापासून महाराष्ट्राबरोबरच कोल्हापूरातही कोरोनाने शिरकाव केला. त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून साऱया शहरवासियांसह सर्वच मंडळांनी सण, समारंभ साध्या पद्धती साजरे करण्याचे ठरवून त्यानुसार कृतीही केली. यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत लहान आणि मोठी गणेश मंडळे, तालीम संस्था कोणती भूमिका घेणार याबद्दल गणेशभक्तांत चर्चा होती. मात्र मंडळांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे गांभिर्य ओळखून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. देखाव्यांच्या काळात गणेशभक्तांची गर्दी खेचणाऱया उमा चित्रमंदिराजवळील प्रतिष्ठीत पुलगल्ली तालीम मंडळ व मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळाने 21 फुटीऐवजी लहान गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणार असल्याचे जाहीर केले आहे. या मंडळांनी आपला हा निर्णय सोशल मीडियावर व्हायरल केला. या निर्णयाचे गणेशभक्तांकडून स्वागत होत आहे.
शनिवार पेठेतील न्यू सम्राट चौक तरुण मंडळ, भगतसिंग मित्र मंडळ व एस. पी. बॉईज या तीन मंडळांनीही कोरोनाच्या काळात जोखिम न पत्करण्याची सजगता दाखविली आहे. 21 फुटीऐवजी लहानच गणेशमूर्ती गणेशोत्सवात बसविण्याचा तीन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी निर्धार केला. एस. पी. बॉईज या मंडळाने तर आदर्शवत असे पाऊल उचलत शाडूची लहान गणेशमूर्ती बनवून घेण्यासाठी बापट पॅम्पातील मूर्तीकार अरविंद बावडेकर यांना ऑर्डरही देऊन टाकली आहे. पापाची तिकटी परिसरातील कुंभार गल्लीतील बजापराव माजगावकर तालीम मंडळाच्या 21 फुटी गणेशमूर्तीकडे कुंभार बांधवांची गणेशमूर्ती म्हणून पाहिले जाते. कारण अनेक मूर्तीकार एकत्र येऊन ही गणेशमूर्ती तयार करत असतात. या मूर्तीकारांनीही कोरोनामुळे लहान गणेशमूर्ती साकारण्यावर एकमत केले आहे. तालमीनेही ऐतिहासिक परंपरा असलेली त्र्यंबोली यात्रा रद्द करुन कोरोनाला रोखण्यासाठी युद्धात आम्ही जिल्हा प्रशासनाच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले.
गेल्या चार दशकांपासून गणेशोत्सव साजरा करत असलेले वाय. पी. पोवारनगर मित्र मंडळ हे गेल्या सात वर्षांपासून 21 फुटी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत आहे. 21 फुटी गणेशमूर्तीमुळेच हे मंडळ शहरात प्रकाशझोतात आले आहे. या मंडळाची गणेशमूर्ती मुंबईत तयार केली जाते. मात्र अलीकडेच मंडळाने मुंबईतील ऑर्डर रद्द करुन कोल्हापूरातील मूर्तीकाराला लहान गणेशमूर्तीची ऑर्डर दिली आहे. हे मंडळ दरवर्षी सामाजिक कार्य म्हणून रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिबिरांची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त लोकांना शिबिरात सहभागी होण्यास उद्युक्त करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक नियाज खान यांनी सांगितले.
नुकसान भरपाईच्या बदल्यात दिला ऍडव्हान्स
सुभाष रोड सावित्रीबाई फुले हॉस्पिटलजवळील विश्वशांत तरुण मंडळाने काही महिन्यांपूर्वी 21 फुटी गण्sाशमूर्तीची ऑर्डर बापट कॅम्प येथील दगडू पुनाळकर यांना दिली होती. दहा हजार रूपये ऍडव्हान्सही दिला होता. पण नंतर या मंडळाने लहान गणेशमूर्तीं बसविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पुनाळकरांना कळविण्यात आला. त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून ऍडव्हान्सचे दहाहजार रूपये परत न घेण्याचा निर्णय विश्वशांती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचे मंडळाचे अध्यक्ष विवेक माने यांनी सांगितले.