कोल्हापूर/प्रतिनिधी
शहरामध्ये गणपती बाप्पांची शुक्रवारी जल्लोषात आगमन झाले. पापाची तिकटी, गंगावेश शाहूपुरी येथील कुंभार गल्लीमध्ये गणेशमूर्ती आणण्यासाठी गर्दी झाली होती. ढोल ताशा अशा पारंपरिक वाद्य आणि फटाक्यांची आतषबाजी करत बाप्पाला घरी नेण्यात आले.
गणपती बाप्पा…मोरया मंगलमूर्ती मोरया… अशा गजरात कोल्हापूर शहरामध्ये बाप्पांचे आगमन झाले. सजवलेल्या रिक्षा, चार चाकी, मोटर सायकल, हातगाडीमधून बाप्पांना वाजत गाजत घरी आणण्यात आले. यावेळी कुंभार गल्लीमध्ये लहानपासून ज्येष्ठांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिक बाप्पांना घेऊन जाण्यासाठी आले होते. पोलिसांनी कुंभार गल्लीतील वाहनसाठी प्रवेश बंद केला होता. दुपारी एकच्या सुमारास कुंभार गल्लीमध्ये बाप्पांना आणण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले नाही . काहीजण मस्क शिवाय आले होते. बाप्पांच्या आगमन प्रसंगी वरुणराजाने ही काही काळ हजेरी लावली.
यावेळी भगव्या टोप्या, भगवे मफलर घालून गणेशमूर्ती घरी नेली. बाप्पांचे घरी आगमन झाल्यानंतर चैतन्यचे वातावरण होते. खीर आणि मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली.