दांडीबहाद्दर शिक्षकांवर कडक कारवाईची मागणी
प्रतिनिधी / शाहुवाडी
लॉकडाऊनच्या सात महिने सुट्टीनंतर सुरू झालेल्या शाळांना सभापती विजय खोत व प्रभारी गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांनी भेटी दिल्या मात्र तालुक्यातील सहा शाळांना कुलपे होती तर संबंधित शाळेत शिक्षक हे गैरहजर दिसून आल्याने सभापती व गटशिक्षणाधिकारी यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून या दांडीबहाद्दर शिक्षकांच्या वर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
सभापती विजय खोत व गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार बुधवार 24 फेब्रुवारी रोजी प्राथमिक शाळा कडेवाडी, पाटेवाडी, केंद्र शाळा पणुंद्रे, केंद्र शाळा शिराळे मलकापूर ,प्राथमिक शाळा पंणुद्रे पैकी शिंदेवाडी, प्राथमिक शाळा कळकेवाडी, या सहा शाळांना भेटी दिल्या मात्र या सहा ही ठिकाणी कोणताही रजा अर्ज अथवा कार्यालय प्रमुख यांची परवानगी न घेता येथील सर्व शिक्षक अनाधिकृत गैरहजर असल्याचे निदर्शनास आले शाळांना कुलूप अशी अवस्था पाहून आश्चर्य व्यक्त केलं गेलं.
गेले आठ नऊ महिने कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालय बंद होती मात्र आता पुन्हा शासनाने शाळा सुरु करण्यास परवानगी दिली त्यानुसार शाळा नियमित सुरू झाल्या खर्या मात्र शाहूवाडी तालुक्यातील शाळांची ही अवस्था पाहून शिक्षण विभागाचे प्रमुख गटशिक्षणाधिकारी व तालुक्याचे सभापती यांना आश्चर्याचा धक्काच बसला ही शिक्षकांची शाळांची दांडी मोहीम सुरू असल्याबद्दल सभापती व प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान या अशा वस्तुस्थितीचा विचार करता शाहूवाडी तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती पाहता शिक्षकांचे अनधिकृतपणे गैरहजर राहण्याचे प्रमाण खूपच वाढलेले दिसत आहे. याचा विपरीत परिणाम शाहूवाडी तालुक्यातील मुलांच्या शिक्षणावर होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. या शाळेमध्ये का गैरहजर होते शिक्षक याची योग्य ती चौकशी करून संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्याबाबत सभापती विजय खोत यांनी सुचित केले आहे. आता या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नागरीकांनी संपर्क करण्याचे आव्हान
या अशा प्रकारे जर तालुक्यातील काही ठिकाणी शिक्षक गैरहजर राहत असतील व अनाधिकृतपणे दांडी मारत असतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असेल तर तालुक्यातील नागरिकांनी शाहूवाडी पंचायत समिती यांच्याकडे व सभापती विजय खोत यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहनही सभापती विजय खोत यांनी केले आहे.