शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते होणार सन्मान, सचिव आर. वाय. पाटील यांची माहिती
न्यू कॉलेज प्रांगणावर रंगणार सोहळा
प्रतिनिधी / कोल्हापूर
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांना शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. शिवाजी पेठेतील न्यू कॉलेज प्रांगणावर दुपारी अडीच वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ असणार आहेत. तर पालकमंत्री सतेज पाटील आणि आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील शैक्षणिक विचारमंचचे सचिव आर. वाय. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील यांनी 60 वर्षाहून अधिक काळ शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देत आपला वेगळा असा ठसा उमठविला आहे. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले. त्यांच्या या उपक्रमांचे अनुकरण राज्यातील सर्व मुख्याध्यापक संघांनी केले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे अबाधित ठेवण्यासाठी शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील शैक्षणिक विचार मंचची स्थापना करण्यात आली. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक अशा 72 जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, चेअरमन आर. डी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, रंगराव तोरस्कर, बी. बी. पाटील, एस. डी. लाड आदी उपस्थित होते.
आमदार आसगांवकर, लाड यांचा विशेष सत्कार
पुरस्कार वितरण सोहळ्या दरम्यान पुणे शिक्षक मतदार संघाचे नुतन आमदार जयंत आसगांवकर आणि पदवीधर आमदार अरुण लाड यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.